विरोधकांकडून खोचक टीका, भाजपचा पलटवार
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
डेव्हॉस येथील इवर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी ऑनलाईन भाषण करीत असताना टेलिप्रॉम्प्टरच्या बिघाडामुळे व्यत्यय आला आहे. या बिघाडामुळे त्यांना आपले भाषण पुन्हा सुरु करावे लागले. या घटनेची चर्चा सोशल मिडियावर होत असून विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीका केली.
या प्रकारावर प्रकाश टाकण्यासाठी भाजपने त्यांच्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मिडियावर शेअर केला असून त्याचे स्पष्टीकरण केले आहे. टेलिप्रॉम्प्टरमध्ये तांत्रिक दोषामुळे बिघाड निर्माण झाला. त्यामुळे पंतप्रधान मोदींना आपले भाषण पुन्हा सुरु करावे लागले. ते हिंदीतून भाषण करीत होते. त्यांच्या हिंदी भाषणाचा इंग्रजी अनुवाद त्याचवेळी कॅप्शनच्या स्वरुपात देण्यात येत होता. पंतप्रधान मोदी भाषण वाचत असताना मध्येच तांत्रिक बिघाडामुळे टेलिप्रॉम्प्टर आणि त्यांचे तोंडी भाषण यात अंतर पडल्याने कार्यक्रमाच्या डेव्हॉस येथील सूत्रसंचालकाने त्यांना भाषण थांबविण्याची आणि पुन्हा प्रारंभापासून सुरु करण्याची विनंती केली. त्यानुसार त्यांनी पुन्हा भाषण सुरु केले. नंतर ते सुरळीत पार पडले.
विरोधकांची टीका
पंतप्रधान मोदी यांच्या भाषणात आलेल्या या अडथळय़ाची खिल्ली विरोधी पक्षांनी, विशेषतः काँगेसने उडविली. पंतप्रधान मोदी वाचून भाषण करतानाही अडखळतात. टेलिप्रॉम्प्टरवर भाषण चालू शकते, शासन चालवता येत नाही, अशी टीका काँगेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली. पंतप्रधान मोदी हे टेलिप्रॉम्प्टर वक्ते आहेत, अशीही टिप्पणी काही काँगेस नेत्यांनी केली. पंतप्रधान मोदी जागतिक परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यात अपयशी ठरले आहेत. त्यांना टेलिप्रॉम्प्टरशिवाय भाषण करता येत नाही, अशीही टीका होत आहे.
तथापि, त्यांच्या भाषणात निर्माण झालेली अडचण त्यांच्या बाजूकडून नसून वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बाजूकडून झाली आहे. त्यामुळे विरोधकांनी इतके उत्साहित होऊ नये. त्यांच्या हाती काही लागणार नाही. कोणत्याही जागतिक परिषदेत सर्व राष्ट्रप्रमुख आधी तयार केलेले भाषणच वाचून दाखवितात. त्यात आश्चर्य काही नाही. कारण तेथे वेळेचे बंधन पाळायचे असते. ही साधी बाब विरोधी पक्षांना माहित नसेल तर ते त्यांचे अज्ञान आहे, असेही मत काही तज्ञांनी व्यक्त केले.








