बुल्ली बाई ऍपची पुनरावृत्ती: सरकारकडून ब्लॉक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
‘बुल्ली बाई ऍप’द्वारे मुस्लीम महिलांच्या बोली लावण्यात आल्याप्रकरणी अटकसत्र्खा सुरू असतानाच हिंदू महिलांना लक्ष्य करणाऱया एका टेलिग्राम चॅनेलचा शोध लागला आहे. हे टेलिग्राम चॅनेल सरकारने आता ब्लॉक केले आहे. माहिती-तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटरवर याची माहिती दिली आहे. या टेलिग्राम चॅनेलसंबंधी ट्विटरद्वारे पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती.
अंशुल सक्सेना नावाच्या एका व्यक्तीने मंगळवारी पोलिसांच्या ट्विटर हँडलला टॅग करत महिलांची छायाचित्रे शेअर करत अश्लील टिप्पणी केल्या जाणाऱया टेलिग्राम चॅनेलची माहिती दिली होती. या महिला हिंदू वेश्या असल्याचा दावा या चॅनेलवर करण्यात येत होता. हिंदू महिलांना लक्ष्य करणारे हे टेलिग्राम चॅनेल जून 2021 मध्ये तयार करण्यात आले होते असे सक्सेना यांनी म्हटले आहे.
अंशुल यांनी स्वतःच्या ट्विटमध्ये केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनाही टॅग केले होते. यावर वैष्णव यांनी सरकारने या टेलिग्राम चॅनेलची दखल घेतल्याचे उत्तर दिले. संबंधित चॅनेल ब्लॉक करण्यात आले असून भारत सरकार टेलिग्राम चॅनेलशी संबंधित लोकांवर कारवाईसाठी राज्यांच्या पोलीस विभागाशी संपर्कात असल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली आहे.
काही महिन्यांपूर्वी बुल्ली बाई ऍपचा विषय समोर आल्यावर शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून यात एका मुलीचाही समावेश असून ती केवळ 18 वर्षांची आहे. मुस्लीम महिलांना लक्ष्य करणाऱया ऍपवरून होत असलेली कारवाईही चर्चेत आहे.









