मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड : लाहोर दहशतवादविरोधी न्यायालयाचा निकाल
लाहोर / वृत्तसंस्था
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि लश्कर-एöतोयबाचा ऑपरेशन कमांडर जकीउर रहमान लखवीला टेरर फंडिंगप्रकरणी पाकिस्तानातील न्यायालयाने 15 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. लाहोरच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने शुक्रवारी लखवीला शिक्षा सुनावली आहे. टेरर फंडिंगसंबंधीत एका प्रकरणात त्याला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती.
2008 मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा लखवी मास्टरमाइंड आहे. लाहोरमध्ये लखवीविरोधात टेरर फंडिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो डिस्पेन्सरीच्या नावाखाली पैसे जमा करत होता आणि त्या पैशांचा वापर दहशतवादी कृत्यांसाठी करत असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यासाठी सदर अर्थपुरवठय़ाचा वापर झाल्याचे तपासात उघड झाले आहे.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी हाफीज सईदसोबत जकीउर रहमान लखवीही मुख्य आरोपी आहे. या प्रकरणी त्याला शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, 2015 पासून तो जामीनावर सुटला आहे. काही दिवसांपूर्वी त्याला अटक करण्यात आल्याने भारतासह अमेरिकेने समाधान व्यक्त केले होते.
संयुक्त राष्ट्रांनीही जकीउर रहमान लखवीला दहशतवादी घोषित केले होते. मात्र, त्याच्यावर कारवाई करण्यात येत नसल्याने तो खुलेआम फिरत होता. मात्र, काळय़ा यादीत जाण्याची भीती असल्याने एफएटीएफच्या बैठकीपूर्वी लखवीला अटक करून पाकिस्तानने त्याच्यावर कारवाई केली आहे. आता न्यायालयाने त्याला 15 वर्षांची शिक्षाही सुनावली आहे.
जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सची (एफएटीएफ) बैठक होणार आहे. ही संस्था विविध देशांना दहशतवादाविरोधात लढण्यासाठी निधी पुरवते. दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करत नसल्याने पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकण्याचा धोका आहे. त्यामुळे या बैठकीपूर्वी पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात कारवाईला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.









