गुजरात टायटन्सला 5 धावांनी हरवले, शेवटच्या षटकात सॅम्स हिरो, गुजरात झिरो
वृत्तसंस्था/ मुंबई
शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमांचक आयपीएल साखळी सामन्यात मुंबई इंडियन्सने टेबलटॉपर्स गुजरात टायटन्सला पराभवाचा हिसका दिला. रोहित-इशानसह टिम डेव्हिडच्या फटकेबाजीमुळे निर्धारित 20 षटकात 6 बाद 177 धावांचा डोंगर रचल्यानंतर मुंबईने गुजरातला 20 षटकात 5 बाद 172 धावांवर रोखत 5 धावांनी निसटता विजय संपादन केला.
विजयासाठी 178 धावांचा पाठलाग करताना गुजराततर्फे साहा (55), शुभमन गिल (52) यांनी 12.1 षटकात 106 धावांची शतकी भागीदारी साकारली. पण, मधली फळी कोसळल्यानंतर तळातील फलंदाजही निष्प्रभ ठरले आणि गुजरातच्या पदरी निराशा आली. शतकी सलामी करणारा संघ पराभूत होण्याची आयपीएलमधील ही पाचवी वेळ आहे.

कर्णधार हार्दिक पंडय़ाने 24 तर साई सुदर्शनने हिट विकेट बाद होण्यापूर्वी 14 धावा जमवल्या. मिलर 14 चेंडूत 19 धावांवर नाबाद राहिला असला तरी तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. शेवटच्या चेंडूवर 6 धावांची आवश्यकता असताना मिलरला एकही धाव घेता आली नाही आणि मुंबईच्या सनसनाटी विजयावर शिक्कामोर्तब झाले.
प्रारंभी, रोहित शर्मा व इशान किशन यांचा फ्लाईंग स्टार्ट व टीम डेव्हिडच्या उत्तरार्धातील जोरदार फटकेबाजीमुळे मुंबई इंडियन्सने 6 बाद 177 धावांपर्यंत मजल मारली. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर रोहित (28 चेंडूत 43), इशान किशन (29 चेंडूत 45) यांनी उत्तम सुरुवात केली. मात्र, पाचवेळचे चॅम्पियन्स मुंबईने मधल्या टप्प्यात अचानक 3 गडी गमावले होते. नंतर केवळ टिम डेव्हिडच्या 21 चेंडूतील जलद 44 धावांच्या खेळीमुळे मुंबईला या सामन्यात आव्हानात्मक धावसंख्या उभी करता आली.
गुजरात टायटन्सतर्फे रशिद खान सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 24 धावात 2 बळी घेतले. याशिवाय, प्रदीप संगवान, लॉकी फर्ग्युसन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. अल्झारी जोसेफनेही एक बळी नोंदवला. मात्र, यासाठी त्याला 4 षटकात 41 धावा मोजाव्या लागल्या. मुंबईचा हा हंगामातील दुसरा विजय ठरला.
ते शेवटचे षटक आणि असे घडले नाटय़!
सॅम्सच्या डावातील शेवटच्या षटकात 9 धावांची आवश्यकता असताना मिलरला पहिल्या चेंडूवर एकेरी धाव घेता आली. त्यानंतर तेवातियाने दुसरा चेंडू निर्धाव घातला तर तिसऱया चेंडूवर दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावचीत झाला. पुढे रशिदला एकेरी धाव घेता आली आणि शेवटच्या 2 चेंडूत 6 धावांची गरज असताना सॅम्सने मिलरला आणखी एक निर्धाव चेंडू टाकला. शेवटच्या चेंडूवर षटकार आवश्यक असताना पुन्हा एकदा सॅम्सनेच बाजी मारली. हा चेंडूही निर्धाव गेला आणि मुंबईने नाटय़मय विजय संपादन केला!
आणि शमीला डेव्हिडने खेचलेला तो षटकार गुजरातसाठी महागडा ठरला!
मुंबईचा संघ फलंदाजी करत असताना डेव्हिडने डावातील शेवटच्या चेंडूवर शमीला डीप मिड विकेटच्या दिशेने उत्तुंग षटकार खेचला आणि हाच षटकार मुंबईला विजय मिळवून देण्यासाठी लाख मोलाचा ठरला. योगायोगाने मुंबई या लढतीत 5 धावांनी विजयी ठरली.
सॅम्स ठरला मुंबईच्या विजयाचा शिल्पकार
विजयासाठी 178 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातने 19 षटकात 4 बाद 169 धावांपर्यंत मजल मारली आणि त्यांना शेवटच्या षटकात विजयासाठी 9 धावांची आवश्यकता होती. मिलर व तेवातियासारखे अव्वल फलंदाज क्रीझवर असल्याने गुजरातला अधिक संधी असणे साहजिक होते. पण, या प्रतिकूल परिस्थितीतही डॅनियल सॅम्सने या षटकात केवळ तीनच धावा दिल्या आणि यामुळे मुंबईच्या नाटय़मय विजयावर शिक्कामोर्तब झाले!
संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्स ः 20 षटकात 6 बाद 177 (इशान किशन 29 चेंडूत 5 चौकारासह 45, रोहित शर्मा 28 चेंडूत 5 चौकार, 2 षटकारांसह 43, टिम डेव्हिड 21 चेंडूत 2 चौकार, 4 षटकारांसह नाबाद 44. अवांतर 7. रशिद खान 2-24, अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, प्रदीप संगवान प्रत्येकी 1 बळी).
गुजरात टायटन्स ः 20 षटकात 5 बाद 172 (वृद्धिमान साहा 40 चेंडूत 55, शुभमन गिल 36 चेंडूत 52, हार्दिक पंडय़ा 14 चेंडूत 24, साई सुदर्शन 14, डेव्हिड मिलर नाबाद 19. अवांतर 4. मुरुगन अश्विन 2-29, केरॉन पोलार्ड 1-13).









