नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोव्हिड-19 च्या अस्मानी संकटामुळे सरावात खंड पडणे भाग होते, त्यावेळी टेबलटेनिसपटू भाविनाबेन पटेल हिच्या समोर देखील प्रश्नचिन्ह उभे ठाकले होते. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने मात्र तिची ही अडचण ओळखून सरावासाठी चक्क रोबोट उपलब्ध करुन दिला आणि या रोबोटमुळेच आपण पॅरालिम्पिक्समध्ये पदक जिंकू शकलो, याचा उल्लेख करत भाविनाबेनने सोमवारी भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे आभार मानले.
रविवारी संपन्न झालेल्या पॅरालिम्पिक्समध्ये भाविनाबेन पटेल ही रौप्य जिंकत पॅरालिम्पिक्स पदक जिंकणारी पहिली भारतीय टेबलटेनिसपटू ठरली. झँगविरुद्ध पराभव पत्करावा लागला असला तरी ती रौप्यपदकाची मानकरी ठरली. आपल्या या यशाचे श्रेय तिने टीटी रोबोटला (बटरफ्लाय-ऍमिकस प्राईम) दिले. या रोबोटची किंमत 2 लाख 73 हजार 500 तर ओट्टोबॅक व्हीलचेअरची किंमत 2 लाख 84 हजार 707 रुपये इतकी आहे.
‘भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या टॉप्स (टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम) उपक्रमांतर्गत मला रोबोट पुरवण्यात आला. हा रोबोट प्रत्येक अँगलमधून फटके परतावू शकतो आणि त्यामुळे मला सरावात वैविध्य आणता आले’, असे भाविनाबेन टोकियोतून परतल्यानंतर वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाली. ऍमिकस प्राईम रोबोटची निर्मिती हंगेरीत झाली असून प्रति मिनिट 120 फटके खेळण्याची त्याची क्षमता आहे. त्यात ड्रिल व बॉल फ्रिक्वेन्सी सेव्ह आहेत.
‘लॉकडाऊन असताना माझ्या पतीने माझ्या सरावासाठी टेबल घरी आणले. त्यावेळी माझ्याकडे सेकंड हँड रोबोट होता. पण, नंतर फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये भारतीय क्रीडा प्राधिकरणाने नवा, अत्याधुनिक रोबोट उपलब्ध करुन दिला. रोबोटशी सराव केल्याने माझा खेळ बहरला. बॉल कंट्रोल, प्लेसमेंटमध्ये सुधारणा झाली’, असे भाविनाबेन पुढे म्हणाली.
तिने याप्रसंगी आपल्या कुटुंबियांकडून मिळालेल्या सहकार्याचा आणि त्यातही पती निकुंज पटेल यांच्या योगदानाचा खास उल्लेख केला. ती म्हणाली, ‘निकुंज स्वतः राज्यस्तरीय क्रिकेट खेळला असून त्याने मलाही सातत्याने प्रेरणा दिली. बऱयाच मर्यादा असल्या तरी तू हे करु शकतेस, हा विश्वास त्याने मला दिला. अहमदाबादला अंध व्यक्तींच्या दिव्यांग संघटनेला भेट दिली, त्यावेळी माझे आयुष्यच बदलून गेले. खेळाकडे वळण्याची खरी प्रेरणा तिथे मिळाली. त्यानंतर मी टेबलटेनिस खेळू लागले आणि एक वेळ तरी अशी आली की, टेबलटेनिस हेच माझे आयुष्य बनले. निकुंजने सांगितले, त्याप्रमाणे मला इथेच अजिबात थांबायचे नाही. यापुढे राष्ट्रकुल स्पर्धेत आणखी सरस कामगिरी साकारण्याचा माझा प्रयत्न असणार आहे’.









