प्रतिनिधी/ फोंडा
शितपेयाची वाहतूक करणारा टेंपो बायथाखोल-बोरी येथे रस्त्याच्या बाजूला खाईत कोसळल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. विनायक खुशाली च्यारी (42, रा. वेळपवाडा, उगे-सांगे) असे चालकाचे नाव आहे. मंगळवारी दुपारी 3.30 वा. सुमारास बायथाखोल येथील उतरणीवजा वळणावर हा अपघात झाला.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत विनायक च्यारी हाच या वाहनाचा मालक असून मंगळवारच्या दिवशी चालक सुट्टीवर गेल्याने तो स्वतः टेंपो चालवित होता. जीए 05 टी 7140 या क्रमांकाची ही आयचर टेंपो पेप्सी कंपनीच्या शितपेयाची वाहतूक करीत आहे. विनायक हा खोर्ली येथून फोंडामार्गे सांगेकडे निघाला होता. वाटेत बायताखोल बोरी येथील उतरणीवजा वळणावर त्याचा वाहनावरील ताबा सुटल्याने टेंपो थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या खाईत साधारण 25 फुट खाली कोसळला. अपघाताची माहिती मिळताच फोंडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. विनायक यांना केबिनमधून बाहेर काढून फोंडय़ातील उपजिल्हा इस्पितळात नेण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. एरवी या टेंपोमध्ये चालकासह एक लोडर असायचा. तो दुसऱया गाडीवर गेल्याने सुदैवाने बचावला.
फोंडा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक परेश सिनारी यांनी घटनास्थळी पंचनामा केला. मृतदेह शवागारात ठेवण्यात आला असून आज बुधवारी शवचिकित्सेनंतर तो कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात येईल. मयत विनायक यांच्यापश्चात पत्नी, आठ महिन्यांची दोन लहान जुळी मुले व दोन भाऊ असा परिवार आहे.









