आयकर सहआयुक्त राजेश्वरी मेनन यांचे बैठकीत प्रतिपादन
प्रतिनिधी / बेळगाव
टॅक्ससंदर्भात अनेक खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यामुळे यातून तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने ‘विवाद से विश्वास’ ही योजना सुरू केली आहे. या योजनेतून करदात्याला केवळ विवादित टॅक्स भरावा लागणार आहे. त्यामुळे सहकारी संस्थांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बेळगाव विभाग आयकर विभागाच्या सहआयुक्त राजेश्वरी मेनन यांनी केले.
बेळगाव आयकर विभागाच्यावतीने बुधवारी सिव्हिल हॉस्पिटल रोडवरील कार्यालयात बेळगाव परिसरातील सौहार्द व को-ऑप. सोसायटीच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी ‘विवाद से विश्वास’ या योजनेची माहिती दिली. व्यासपीठावर उपायुक्त चेतन के., आयकर अधिकारी आय. बी. अंगडी, बेळगाव जिल्हा को-ऑप. सोसायटी युनियनचे सीईओ एस. व्ही. हिरेमठ उपस्थित होते.
त्या पुढे म्हणाल्या, सोसायटींमधून नागरिकांना कर्जपुरवठा करण्यात येतो. परंतु काहीवेळा टॅक्ससंदर्भात समस्या उद्भवतात. मग त्या विविध न्यायालयांपर्यंत जातात. परंतु आता त्या सोडविण्यासाठी सरकारने ही योजना आणली आहे. वादविवादांमध्ये अडकलेले खटले सोडविण्यासाठी मदत होईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी इन्स्पेक्टर मृणाल बापट, पी. देसाई, नितू जोशी, को-ऑप. सोसायटीचे पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमात निपाणी, बागलकोट, विजापूर, गोकाक येथील सदस्य व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते.









