मुदतवाढ नंबरप्लेटवरील शेवटच्या 2, 3 क्रमांकानांच
प्रतिनिधी / पणजी
गोव्यात नोंदणी करण्यात आलेल्या पर्यटक प्रवासी टॅक्सी (कॅब) ज्यांच्या नोंदणी क्रमांकातील शेवटचा अंक 2 किंवा 3 असेल त्यांना डिजिटल मीटर बसवण्यासाठी 18 ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली असून त्या मुदतीत ज्या टॅक्सी मीटर बसवणार नाहीत त्यांचे परवाने रद्द होणार असल्याचा इशारा वाहतूक खात्याने दिला आहे.
खात्यातर्फे यासंदर्भातील जाहीर नोटीस प्रकाशित करण्यात आली असून 0 किंवा 1 हा शेवटचा अंक असलेल्या नोंदणी क्रमांकाच्या टॅक्सीसाठी 25 जुलै अशी मुदत देण्यात आली होती. त्या मुदतीत फक्त 137 टॅक्सींना मीटर बसवण्यात आले तर 500 टॅक्सींचे त्या कामासाठी आरक्षण झाले आहे. नोंदणी क्रमांकाच्या शेवटी 0 ते 1 अंक असलेल्या मालिकेतील सुमारे अंदाजे 3000 टॅक्सींनी मीटरसाठी प्रतिसाद दिला नसल्याचे समोर आले असून त्याचे परवाने रद्द करण्याचे सरकारने जाहीर केले आहे.
आता शेवटचा अंक 2 किंवा 3 असलेल्या नोंदणी क्रमांकातील टॅक्सींना 18 ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
मीटर बसविण्यासाठी सात केंद्रे
डिजिटल मीटर बसवण्यासाठी राज्यात एकूण 7 ठिकाणी केंद्रे सुरू करण्यात आली असून त्यांचा पत्ता-मोबाईल नंबर, ई-मेल अशी माहिती नोटीसीतून देण्यात आली आहे. रोजमेरता ऑटोटेक प्रा. लि. ची. 4 केंद्रे असून सिक्युरीनेक्स आयएनसी या कंपनीची तीन केंद्रे आहेत. बोर्डे-डिचोली-मोबाईल – 9911008370, मेरशी मोबाईल – 9911008395, नावेली-सालसेत-मोबाईल – 9911008376, दाबोळी मोबाईल – 9911008392, पर्वरी मोबाईल – 9318493958, वास्को-मोबाईल-8368329578, फातोर्डा – मोबाईल – 8368333710 अशा एकूण 7 ठिकाणी खासगी कंपनीमार्फत डिजिटल मीटर बसवण्यात येणार असल्याची माहिती नोटीसीत समाविस्ट आहे. टॅक्सी चालकांनी मालकांनी डिजिटल मीटर बसवण्यासाठी नोंदणी आरक्षण करावे असे वाहतूक खाते संचालकांकडून नोटीसीद्वारे कळवण्यात आले आहे.









