उसप येथील घटना : चालकाचे नियंत्रण सुटले
अपघातानंतर चालकाचा पलायनाचा प्रयत्न
वार्ताहर / दोडामार्ग:
उसप-धुरीवाडा येथील चंद्रावती वासुदेव धुरी (73) या वृद्धेsला ट्रक्टरने समोरून धडक दिली. त्यात त्यांच्या पायावरून टॅक्टरचे चाक गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. तेथील स्थानिक ग्रामस्थांनी उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करून अधिक उपचारासाठी गोवा-बांबोळी येथे नेत असताना वाटेतच त्यांचे निधन झाले.
याबाबत तेथील ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार उसप-धुरीवाडा येथील चंद्रावती धुरी या सकाळीच आपल्या शेतात जात होत्या. त्याचवेळी समोरून ट्रक्टर घेऊन येणारा चालक राजेंद्रसिंग धनसिंह राजपूत (रा. राजस्थान) याचे नियंत्रण सुटल्याने ट्रक्टरची धडक धुरी यांना बसली. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्याचवेळी त्या दिशेने जाणाऱया वाहनचालकाने वाडीतील ग्रामस्थांना त्याची कल्पना दिली. लागलीच ग्रामस्थ घटनास्थळी दाखल होऊन गंभीर अवस्थेत असलेल्या
श्रीमती धुरी यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अधिक उपचारासाठी गोवा-बांबोळी येथे नेत असताना वाटेतच त्यांचे निधन झाले. धुरी यांच्या पश्चात पती, मुलगे, सुना, विवाहित मुली, नातवंडे असा परिवार आहे. घटनेवेळी उसप सरपंच दिनेश नाईक, माजी उपसभापती बाळा नाईक आदींनी मतदकार्यात सहभाग घेतला.
ग्रामस्थांनी चालकाला पकडले
टॅक्टरचालक सकाळी सात वाजण्याच्या सुमारास क्रशरसाठी लागणारे दगड फोडण्यासाठी उसपहून तळेखोल येथील एका दगडखाणीवर जात होता. उसप धुरीवाडा येथे आल्यावर त्याचे ट्रक्टरवरील नियंत्रण सुटून समोरून येणाऱया श्रीमती धुरी यांना धडक दिली. त्यात गंभीर दुखापत होऊन उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. अपघातानंतर तेथून पळून जात असलेल्या ट्रक्टरचालकाला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. यावेळी ग्रामस्थांनी तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप केला. त्याची चौकशी करत असताना तो कोणाच्या क्रशरवर जात होता? तसेच कोणाकडे कामाला होता, याबाबत विचारले असता त्याने माहिती दिली नाही. ग्रामस्थांनी उसप, पिकुळे, तळेखोल परिसरात असलेल्या दगड खाणी, क्रशर मालक यांच्याशी संपर्क साधला. परंतु माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक होत संबंधित व्यवसाय करणाऱयांना प्रतिबंध करणार असल्याचे सांगितले. उशिरापर्यंत या घटनेची दोडामार्ग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली नव्हती. उशिरापर्यंत मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला नव्हता.
दोन महिन्यातील दुसरी घटना
तालुक्यात सुरू असलेल्या क्रशर, दगड खाणी या व्यवसायासंबंधी असलेल्या वाहतुकीबद्दल नागरिकांच्या तक्रारी वाढत असताना दोन महिन्यापूर्वी तळेखोल येथे खडी वाहतूक करणाऱया डंपरने गाईला धटक दिल्याने तिचा मृत्यू झाला होता. त्याप्रकरणी तसेच बेकायदेशीर वाहतूक आणि क्रशरबद्दल ग्रामस्थांनी उपोषण केले होते. त्यानंतर उसप येथे ट्रक्टरची महिलेला धडक बसून मृत्यू झाला. त्यामुळे बेकायदेशीर आणि नियंत्रण न राहिलेल्या खडी तसेच संबंधित वाहतुकीबद्दल
ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे.
ट्रक्टर चालकाबद्दल माहिती देण्यास टाळाटाळ
अपघात झाल्यानंतर संबंधित टॅक्टर चालकाची माहिती घेण्यासाठी उसप, पिकुळे, तळेखोल, साटेली-भेडशी येथील गौणखनिज (खडी) व्यावसायिकांशी संपर्क साधला. मात्र, कोणीही माहिती दिली नाही. त्यावेळी उपसभापती बाळा नाईक यांनी आक्रमक होत अशा प्रकारच्या व्यवसाय करणाऱयांविरोधात आंदोलन करू, असे सांगितले.









