वृत्त संस्था/ नवी दिल्ली
येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान भारतात होणाऱया आयसीसीच्या पुरूषांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नऊ केंद्राची शिफारस केली आहे. या स्पर्धेसाठी अहमदाबाद, बेंगळूर, चेन्नई, दिल्ली, धर्मशाला, हैद्राबाद, कोलकाता, लखनौ आणि मुंबई ही नियोजित क्रिकेट केंद्रे राहतील.
गेल्या आठवडय़ात झालेल्या बीसीसीआय कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी खेळविण्यात येणाऱया सामन्यांची ठिकाणे निश्चित करण्यात आली. बीसीसीआयकडून या 9 केंद्राची यादी आयसीसीकडे पाठविली आहेत. आता भारतातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत आयसीसीकडून अंतिम निर्णय घेतला जाईल.
आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान भारतात होणार आहे. या स्पर्धेत 16 संघांचा सहभाग राहील. या स्पर्धेतील अंतिम सामना 13 नोव्हेबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळविला जाणार आहे. भारतातील कोरोनाच्या दुसऱया लाटेने सध्या चांगलेच थैमान घातल्याने भारतासमोर या स्पर्धेचे मोठे आव्हान राहील. 26 एप्रिलला आयसीसीचे एक पथक भारतात येणार आहे.
सध्या भारतात सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेवर आयसीसीने आपले लक्ष केंद्रीत केले आहे. आयसीसीची ही स्पर्धा सुरूवातीला 2020 साली ऑस्ट्रेलियात घेण्याचे ठरले होते पण, कोरोना महामारीमुळे ही स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 2021 आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद भारताला मिळाले आहे. त्यामुळे 2022 आयसीसी स्पर्धा ऑस्ट्रेलियात घेतली जाईल.









