महामारी परिस्थितीत सुधारणा न झाल्यास निर्णय होणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतातील कोव्हिड 19 च्या प्रकोपाने निर्माण झालेल्या परिस्थितीत सुधारणा न झाल्यास या वर्षी भारतात होणारी टी-20 विश्वचषक स्पर्धा संयुक्त अरब अमिरातमध्ये घेतली जाण्याची शक्यता आहे, असे बीसीसीआयने सांगितले.
ही स्पर्धा होण्यास सहा महिन्याचा अवधी असताना शुक्रवारी भारतात 3 लाख 86 हजारहून अधिक कोरोनाची बाधा झालेले नवे रुग्ण आढळले आहेत. वैद्यकीय जाणकारांच्या मते रुग्णांची प्रत्यक्ष संख्या याहून पाच ते दहा पट अधिक असण्याची शक्यता आहे. ही स्पर्धा भारतातच घेण्याबाबत ठाम असल्याचे आयसीसीने अलीकडेच म्हटले होते. पण पर्यायी योजना तयार केली असल्याचेही त्यांनी म्हटले होते. त्यावेळी त्यांनी कोणता पर्याय असणार, हे स्पष्ट केले नव्हते. ‘संयुक्त अरब अमिरात या ठिकाणी ही स्पर्धा घेतली जाऊ शकते,’ असे बीसीसीआयचे सरव्यवस्थापक धीरज मल्होत्रा यांनी गुरुवारी बीबीसीशी बोलताना म्हटले होते. ‘यूएईमध्ये ही स्पर्धा घेतली जाईल. मात्र त्याचे आयोजन बीसीसीआयतर्फेच केले जाईल,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. मल्होत्रा हे या स्पर्धेचे संचालकही आहेत.
एका वृत्तसंस्थेने त्यांना फोन करून व संदेश पाठवून अधिक स्पष्टीकरण देण्याबाबत विचारले होते. पण त्यांनी त्याला प्रतिसादच दिला नाही. मात्र आयसीसीच्या प्रवक्त्याने या योजनेची माहिती देत दुजोरा दिला. सध्या भारतात कोरोना महामारीचा प्रचंड उद्रेक सुरू असतानाही आयपीएल स्पर्धा खेळविली जात आहे. त्यावर आयसीसीने बारीक नजर ठेवली आहे. ‘इतक्यातच निर्णय घेणे घाईचे ठरेल,’ असे हा प्रवक्ता म्हणाला. कोरोना महामारीमुळेच मागील वर्षीची आयपीएल स्पर्धा यूएईमध्ये खेळविण्यात आली होती. त्यासाठी बीसीसीआयने संयुक्त अरब अमिरात क्रिकेट मंडळाशी (ईसीबी) यजमानपदाचा करार केला होता. वृत्तसंस्थेने या संदर्भात ईसीबीशी संपर्क साधून या स्पर्धेच्या सज्जतेबाबत विचारले असता त्यांनी भाष्य करण्याचे टाळले.









