वृत्तसंस्था/ पर्थ
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली टी-20 विश्वचषक स्पर्धेत एक हजार धावांचा माईलस्टोन गाठणारा दुसरा फलंदाज बनला आहे. रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सुपर 12 फेरीतील सामन्यात त्याने हा पराक्रम केला.
येथील स्पर्धेत कोहलीने दोन मॅचविनिंग डाव (नाबाद 82 व नाबाद 62) खेळले आहेत. मात्र द.आफ्रिकेविरुद्ध त्याला हा फॉर्म टिकविता आला नाही. तो 11 चेंडूत 12 धावा काढून बाद झाला. कोहलीच्या आता टी-20 वर्ल्ड कपमध्ये 24 सामन्यात 1001 धावा झाल्या असून सर्वाधिक 1016 धावा जमविणाऱया लंकेच्या महेला जयवर्धनेचा विक्रम मोडण्यासाठी त्याला आणखी 16 धावांची गरज आहे. याच स्पर्धेत तो हा विक्रम मागे टाकणार हे निश्चित आहे. जयवर्धनेने 31 सामन्यात या धावा जमविल्या होत्या. विंडीजचा ख्रिस गेल 33 सामन्यात 965 धावा जमवित तिसऱया तर भारतीय कर्णधार रोहित शर्मा 36 सामन्यात 919 धावा जमवित चौथ्या स्थानावर आहे.