पुणे/प्रतिनिधी :
भारत विरूद्ध श्रीलंका टी-20 क्रिकेट मालिकेतील तिसरा सामना शुक्रवारी पुण्यातील गहुंजे मैदानात होणार आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे वाया गेला, तर दुसऱया सामन्यात भारताने विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे पुण्यातील सामना निर्णायक ठरणार आहे. ही लढत जिंकून भारतचा मालिका जिंकण्याचा मानस असेल, तर श्रीलंका मालिकेत बरोबरी करण्याचा प्रयत्न करेल.
या मालिकेसाठी रोहित शर्मा विश्रांती देण्यात आली असल्याने भारताकडून सलामीला के. एल. राहुल आणि शिखर धवन यांनी इंदूरमध्ये डावाची सुरुवात चांगली केली असली, तरी शिखरला अजूनही पहिल्यासारखा फॉर्म अद्याप दाखविता आलेला नाही. त्यामुळे त्याच्या फलंदाजीकडे सर्वांचेच लक्ष्य आहे. इंदूरमध्ये कर्णधार विराट कोहलीच्या जागेवर श्रेयस अय्यरला संधी देण्यात आली, त्या संधीचे त्याने सोने करत भारताचा विजय पक्का केला. तरी रिषभ पंतवर अजूनही सर्वांच्या नजरा आहेत, वन-डे आणि टी-20 मध्ये इतक्या संधी मिळूनदेखील पंतला अजून स्वतःला सिद्ध करता आलेले नाही. त्यामुळे येणाऱया टी-20 स्पर्धेसाठी महेंद्रसिंग धोनीला भारतीय संघात स्थान द्यावे, अशी क्रिकेटशैकिनांची मागणी आहे. त्यामुळे पंतवर चांगली कामगिरी करण्याचे आणि संघात स्थान टिकवून ठेवण्याचे आव्हान आहे.
गोलंदाजीत देखील भारतीय गोलंदाजांनी इंदूरमधील सामन्यात अचूक मारा केला आहे. शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी आणि या दुखापतीतून कमबॅक करत असलेल्या जसप्रित बुमराह या जलदगती गोलंदाजांनी चांगली चमक दाखविली आहे. तर कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर यांनी फिरकीची कमान समर्थपणे संभाळली आहे. श्रीलंकेचा संघ नवीन दिसत असला तरी त्यांच्याकडूनदेखील चांगल्या कामगिरीच्या अपेक्षा आहेत. गोलंदाजीत लसिथ मलिंगासोबत कुमारा, शनाका यांच्याबरोबर इतर गोलंदाजांनादेखील योग्य टप्पा ठेवावा लागेल. तर फलंदाजीतदेखील अविष्का, कुसल परेरा, गुणथिलका यांच्यासह सर्वांना अचूक फटके मारावे लागतील. तसेच क्षेत्ररक्षणातही त्यांना सुधारणा करावी लागणार आहे.
आता गोलंदाजीत सातत्याने बदल करावे लागतात : कुलदीप यादव
टी-20 मध्ये गोलंदाजी करण्यात गोलंदाजांचा खरा कस लागतो. फलंदाजांनुसार गोलंदाजीत बदल करावे लागतात. तसेच आत्ताच्या टेक्नॉलॉजीमध्ये एखाद्या गोलंदाजाचा अभ्यास करणे सोपे झाले आहे. त्यामुळे गोलंदाजांना आपल्या गोलंदाजीत सातत्याने बदल करावे लागतात. संघात मी किंवा यजुवेंद्र चहल दोघांपैकी एकालाच स्थान मिळत आहे. परंतु, हा निर्णय थिंक टँकचा असतो. छोटय़ा मैदानावर गोलंदाजीचा प्लॅन वेगळा आखावा लागतो. 2019 हे वर्षात मला खूप शिकण्यास मिळाले. त्यावेळी यापेक्षाही आपण चांगले करू शकतो, असे जाणवले. त्यामुळे प्रत्येक सामन्याच्या आधी प्लॅन करण्यासाठी वेळ दिला पाहिजे. कसोटी सामना हा 5 दिवसांचाच असावा, कारण जी गोष्ट क्लासिक आहे, ती क्लासिकच ठेवली पाहिजे, असे मला वाटते, अशा भावना कुलदीप यादव याने पत्रकारांशी बोलताना व्यक्त केल्या.
आमच्याकडेदेखील अनेक स्किलफूल खेळाडू : मिकी आर्थर
भारतीय संघात अनेक चांगले तरूण खेळाडू असले, तरी आमच्याकडेदेखील अनेक स्किलफूल खेळाडू आहेत. त्यांना आम्ही घडवत आहोत. भारताचे तरुण खेळाडू 70 टक्के स्किलफूल असले, तरी आमचेदेखील 40 टक्के आहेत. पुढील 8 महिन्यांत आम्ही त्यांना चांगल्या प्रकारे घडवून ते चांगल्यात चांगल्या संघाला टक्कर देऊ शकतात. भारतात 170 ही धावसंख्यादेखील कमी असू शकते. कसोटी क्रिकेट पाच दिवसांचे असावे, कारण त्यात खूप कस लागतो. मेंटल, फिजिकल टेस्ट ही खरी कसोटी क्रिकेटमध्ये लागते, असे श्रीलंकेचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी नमूद केले.
दोन्ही संघ :
भारत : लोकेश राहुल, विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, शिवम दुबे, मनीष पांडे, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, जसप्रित बुमराह, नवदीप सैनी, शार्दुल ठाकुर, संजू सॅमसंग
श्रीलंका : अविष्का फर्नांडो, गुणथिलका, ओशाडा फर्नांडो, कुसल परेरा, दासुन शनाका, अँजेलो मॅथ्यूज, इशुरू उडाना, धनंजया डिसिल्वा, राजपक्ष, वानिंडू हसरंगा डिसिल्वा, लसिथ मलिंगा (कर्णधार),कुसल मेंढींस, लाहिरू कुमारा, कसुन राजिथा









