यजमान ऑस्ट्रेलियासाठी आज अस्तित्वाची लढत : जडेजाच्या गैरहजेरीतही भारताचे पारडे वरचढ
सिडनी / वृत्तसंस्था
कन्कशन वादामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या रविंद्र जडेजाला उर्वरित मालिकेत खेळता येणार नसले तरी आज (दि. 6) यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱया दुसऱया टी-20 मालिकेत आणखी एका धमाकेदार विजयासह भारतीय संघ मालिकाविजयावर शिक्कामोर्तब करेल, अशी अपेक्षा आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेत भारत सध्या 1-0 फरकाने आघाडीवर आहे. आजच्या लढतीला भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी 1 वाजून 40 मिनिटांनी सुरुवात होईल.
मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेत सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर होणारे उर्वरित दोन्ही सामने जिंकून त्यानंतर कसोटी मालिकेवर लक्ष केंद्रित करणे, हे आपले लक्ष्य असेल, याचा सूचक इशारा भारताने पहिल्या टी-20 सामन्यातील आक्रमक खेळाच्या बळावर दिला. आज होणाऱया दुसऱया टी-20 सामन्यात जडेजाची गैरहजेरी जाणवणार असली तरी भारतीय संघ यापूर्वीप्रमाणेच आक्रमक पवित्र्यावर भर देईल, असा होरा आहे.
पहिल्या टी-20 सामन्यात जडेजाच्या 23 चेंडूतील नाबाद 44 धावांच्या झंझावातामुळेच सारे चित्र बदलून गेले होते व सर्वसाधारण धावसंख्येवरुन आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत भारताने मजल मारली होती. मात्र, तळाचे फलंदाज त्याची उणीव भरुन काढण्यात सक्षम ठरतील आणि त्यापूर्वी आघाडीचे 5 फलंदाज भरीव धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरतील, अशी विराटला आशा आहे.
कांगारुंना फिंचच्या दुखापतीची चिंता
मालिकेत पिछाडीवर असलेल्या यजमान ऑस्ट्रेलियाला येथे कर्णधार ऍरॉन फिंच पूर्ण तंदुरुस्त नसल्याने त्याची मुख्य चिंता आहे. डेव्हिड वॉर्नर धोंडशिरेच्या दुखापतीमुळे यापूर्वीच बाहेर फेकला गेला असल्याने वनडेतील घोडदौड येथे ऑस्ट्रेलियाला कायम राखता आलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे.
नवोदित डॅर्सी शॉर्टला पहिल्या टी-20 सामन्यात आपला नैसर्गिक खेळ साकारता आला नाही आणि तो सहजपणे चहलच्या जाळय़ात सापडला. डॅर्सीच्या भात्यात ऑफसाईडच्या दिशेने फारसे फटके नाहीत आणि चहलने ही बाब हेरत फक्त ऑफसाईडच्या रोखानेच मारा केला. स्टीव्ह स्मिथ दिग्गज फलंदाज असला तरी तो टी-20 तील सर्वोत्तम खेळाडू कधीच ठरला नाही आणि सहकारी फलंदाजांकडे सूत्रे सोपवण्यासाठीच तो अधिक ओळखला गेला आहे. ग्लेन मॅक्सवेलच्या खेळातील मर्यादा शेवटची वनडे व पहिल्या टी-20 मध्ये अनुक्रमे जसप्रित बुमराह व थंगसरु नटराजन यांनी चव्हाटय़ावर आणली आहे.
धवन-कोहलीला सूर सापडणार?
भारतीय संघाला अनुभवी सलामीवीर शिखर धवनच्या फॉर्मची अद्याप प्रतीक्षा असून दस्तुरखुद्द कर्णधार विराट कोहली देखील आपल्या लौकिकाला साजेशी खेळी साकारण्याच्या प्रतिक्षेत आहे. विराटला नेहमीचा सूर सापडला तर भारताच्या निम्या चिंता चुटकीसरशी मिटतील, हे देखील तितकेच निश्चित आहे. मनीष पांडेला आणखी एक संधी मिळणार का, याची येथे उत्सुकता असेल. अर्थात, झाम्पाविरुद्ध तो झगडत राहिला असून हीच मुख्य अडचण ठरत आली आहे. पांडे व श्रेयस अय्यर या दोघांनाही जम बसवण्यासाठी बराच वेळ द्यावा लागतो, ही देखील वस्तुस्थिती आहे.
ऑस्ट्रेलियाने कसोटी स्पेशालिस्ट नॅथन लियॉनला अनपेक्षित संधी दिली असून अंतिम संघात स्वेप्सनऐवजी त्याला खेळवले जाणार का, हे लढतीपूर्वी निश्चित होईल. लियॉनला संधी दिल्यास त्याला पॉवर प्लेमध्येच अधिक गोलंदाजी दिली जाईल, असा होरा आहे. भारताने पहिल्या 6 षटकात याप्रमाणे वॉशिंग्टन सुंदरकडून गोलंदाजी करवून घेतली होती.
संभाव्य संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयांक अगरवाल, केएल राहुल (उपकर्णधार, यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पंडय़ा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल, जसप्रित बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, टी. नटराजन, शार्दुल ठाकुर.
ऑस्ट्रेलिया : ऍरॉन फिंच (कर्णधार), सीन ऍबॉट, मिशेल स्वेप्सन, ऍलेक्स कॅरे, नॅथन लियॉन, जोश हॅझलवूड, मोईसेस हेन्रिक्यूज, मार्नस लाबुशाने, ग्लेन मॅक्सवेल, डॅनिएल सॅम्स, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोईनिस, मॅथ्यू वेड, डॅर्सी शॉर्ट, ऍडम झाम्पा.
सामन्याची भारतीय प्रमाणवेळ : दुपारी 1.40 वा.









