वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीने वनडे व टी-20 ची ताजी मानांकन यादी जाहीर केली असून टी-20 सांघिक क्रमवारीत भारताने दुसरे स्थान कायम राखले आहे तर वनडेमध्ये भारतीय संघाची एका स्थानाची घसरण होऊन तिसऱया स्थानावर पोहोचला आहे. न्यूझीलंडला वनडेत अग्रस्थान मिळाले आहे.
टी-20 मध्ये इंग्लंड 277 गुणांसह अग्रस्थानावर असून भारत त्यांच्यापेक्षा 5 मानांकन गुणाने मागे आहे. या कालावधीत इंग्लंडने पाकविरुद्धची तीन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत राखली, ऑस्ट्रेलियाचा 2-1 आणि दक्षिण आफ्रिकेचा 3-0 असा पराभव केला. त्यानंतर भारतातील मालिका त्यांना 2-3 अशा निसटत्या फरकाने गमवावी लागली. न्यूझीलंडनेही मानांकनात प्रगती केली असून ते पाचवरून तिसऱया स्थानी पोहोचले आहेत. त्यांनी विंडीज, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया व बांगलादेश यांच्याविरुद्धच्या मालिका जिंकल्या आहेत. ऑस्ट्रेलियाची मात्र घसरण झाली असून ते तीनवरून पाचव्या स्थानावर पोहोचले आहेत.
अन्य संघात लंका व बांगलादेश यांनी एका स्थानाची प्रगती केली असून ते अनुक्रमे आठव्या व नवव्या स्थानावर आहेत तर विंडीजची दोन स्थानाने घसरण झाली असून ते आता दहाव्या स्थानावर विसावले आहेत. आयसीसीने सांगितल्यानुसार, या ताज्या मानांकनासाठी 2017-18 मधील निकालांचा विचार करण्यात आलेला नाही तर 2019-20 या कालावधीत झालेल्या सामन्यांच्या निकालाना 50 टक्के वेटेज देण्यात आले आहे, त्यात 2019 मधील विश्वचषक स्पर्धेचाही समावेश आहे.
वनडेत भारत तिसऱया स्थानी
वनडे संघाच्या नव्या वार्षिक अपडेटनुसार भारताची तिसऱया स्थानी घसरण झाली असून ऑस्ट्रेलिया दुसऱया व न्यूझीलंडने पहिल्यांदाच अग्रस्थान मिळविले आहे. विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंडला मागे टाकत न्यूझीलंडने पहिले स्थान पटकावले आहे. त्यांनी बांगलादेशचा 3-0 असा पराभव केला. गेल्या वर्षभरात त्यांनी ही एकमेव वनडे मालिका खेळली आहे. त्यांनी 3 मानांकन गुण मिळवित दोन स्थानांची प्रगती करून अग्रस्थानावर झेप घेतली आहे. त्यांचे एकूण 121 गुण झाले असून ऑस्ट्रेलिया 118 गुणांसह दुसऱया, भारत व इंग्लंड प्रत्येकी 115 गुणांसह तिसऱया व चौथ्या स्थानावर आहेत. दशांश गुणांत पुढे असल्याने भारताला तिसरे स्थान मिळाले आहे. इंग्लंड चौथ्या स्थानावर घसरले आहे. गेल्या वर्षभरात त्यांना ऑस्ट्रेलिया व भारताकडून मालिका पराभव स्वीकारावा लागला आणि आयर्लंडविरुद्धच्या एकमेव वनडे सामन्यातही ते पराभूत झाले होते. अफगाणिस्तान, पाकिस्तान किंवा द.आफ्रिका यांच्या क्रमवारीत कोणताही बदल झाला नाही. अफगाणिस्तान वनडेत दहाव्या, टी-20 मध्ये सातव्या, पाकिस्तान वनडेत सहाव्या, टी-20 मध्ये चौथ्या, दक्षिण आफ्रिका वनडेत पाचव्या, टी-20 मध्ये सहाव्या क्रमांकावर आहेत.









