वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीने बुधवारी जाहीर केलेल्या टी-20 च्या ताज्या मानांकनात भारतीय कर्णधार विराट कोहलीने पुन्हा एकदा अव्वल पाचमध्ये स्थान मिळविले आहे तर इंग्लंडच्या जोस बटलरने पुन्हा एकदा पहिल्या 20 मध्ये प्रवेश मिळविला आहे.
कोहली या प्रकारातील माजी अग्रमानांकित असून तो सध्या वनडे मानांकनातही अग्रस्थानावर आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱया व तिसऱया टी-20 सामन्यात त्याने 73 व नाबाद 77 धावांची खेळी केल्यानंतर 47 मानांकन गुणांची कमाई केल्याने त्याला एका स्थानाची बढती मिळाली आहे. तो आता पाचव्या स्थानावर पोहोचला असून क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात अव्वल पाचमध्ये स्थान मिळविणारा तो एकमेव फलंदाज आहे. बटलरने तिसऱया सामन्यात नाबाद 83 धावांची मॅचविनिंग खेळी केल्याने त्याला पाच स्थानांची बढती मिळाली असून तो आता 19 व्या स्थानावर पोहोचला आहे. ऑक्टोबर 2018 मध्ये त्याने 17 व्या स्थानापर्यंत मजल मारली होती. याशिवाय श्रेयस अय्यरने 32 स्थानांची प्रगती करीत 31 वे, रिषभ पंतने 30 स्थानांची प्रगती करीत 80 वे स्थान मिळविले आहे. अष्टपैलूंमध्ये वॉशिंग्टन सुंदरने 2 स्थानांची प्रगती करीत 11 वे स्थान घेतले आहे तर गोलंदाजांत शार्दुल ठाकुरने 14 स्थानांची झेप घेत 27 वे व भुवनेश्वर कुमारने 7 स्थानांची झेप घेत 45 वे स्थान मिळविले आहे.
इंग्लंडसाठी तिसऱया सामन्यात नाबाद 40 धावा करणाऱया बेअरस्टोने दोन स्थानांची प्रगती करीत 14 वे स्थान घेतले आहे. त्याचाच सहकारी डेव्हिड मलान या क्रमवारीत अग्रस्थानी आहे. जेसॉन रॉयनेही प्रगती केली असून चार स्थानांची झेप घेत त्याने 24 व्या स्थानावर मजल मारली आहे. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने एकदम 43 स्थानांची झेप घेत 34 वे तर मार्क वूडने 59 स्थानांची झेप घेत 39 वे त्याचप्रमाणे डावखुरा सीम गोलंदाज सॅम करणने 41 स्थानांची झेप घेत 74 वे स्थान मिळविले आहे.
पुरुषांच्या वनडे मानांकनात लंकेविरुद्धच्या मालिकेत मालिकावीरचा मान मिळविणाऱया विंडीजच्या शाय होपने पाच स्थानांची प्रगती करीत संयुक्त सातव्या स्थानावर झेप घेतली आहे. निकोलस पूरन 32 (एका स्थानाची प्रगती), एविन लुईस 44 (10 स्थानांची प्रगती), डॅरेन ब्रॅव्हो 99 (8 स्थानांची प्रगती) यांनाही क्रिकेट वर्ल्ड कप सुपर लीग सिरीजमधील चांगल्या कामगिरीचा फायदा झाला आहे. वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफने सात स्थानांची बढती मिळवित 27 वे स्थान घेतले आहे. लंकेतर्फे फलंदाजीत दनुष्का गुणतिलकाने 20 स्थानांची बढती मिळवित 51 व्या, गोलंदाजीत पी. डीसिल्वाने 94 वरून 66 व्या, लक्षण संदकनने 124 वरून 99 व्या स्थानावर मजल मारली आहे.
कसोटी मानांकनात अफगाणच्या हशमतुल्लाह शाहिदीने नाबाद 200 धावांची खेळी केल्यानंतर फलंदाजांमध्ये टॉप 100 मध्ये स्थान मिळविले आहे. 47 स्थानांची झेप घेत तो 90 व्या स्थानावर पोहोचला आहे. 164 धावा करणारा कर्णधार असगर अफगाण 65 व्या स्थानावर पोहोचला आहे. गोलंदाजीत रशिद खानने 9 स्थानांची बढती मिळवित 32 वे स्थान मिळविले आहे. झिम्बाब्वेचा कर्णधार सीन विल्यम्सने 151 धावांची खेळी करीत 24 वे स्थान मिळविले आहे. त्याचे एकूण 621 रेटिंग गुण झाले आहेत. डोनाल्ड तिरिपानोनेही 95 धावांची खेळी करीत 22 स्थानांची बढती मिळविली. तो आता 123 व्या स्थानावर पोहोचला आहे.









