बाजारमूल्यात रिलायन्स इंडस्ट्रीजसोबत स्पर्धा : बायबॅकच्या घोषणेमुळे समभागाची उसळी
वृत्तसंस्था/ मुंबई
देशातील सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) समभागाचा बायबॅक शुक्रवारी खुला झाला आहे. कंपनी 16 हजार कोटी रुपये मूल्याच्या समभागांचे बायबॅक करणार असल्याची माहिती आहे. या बातमीमुळे कंपनीच्या समभागांनी तब्बल एक वर्षांचा उच्चांकी टप्पा गाठला आहे. सदरच्या बायबॅकची घोषणा कंपनीने आपल्या तिमाही अहवालादरम्यान केली होती.
कंपनीचे समभाग शुक्रवारी मुंबई शेअर बाजारात जवळपास 2 टक्क्यांनी वधारुन 2,896 रुपयांवर राहिले आहेत. यासोबतच कंपनीचे बाजारमूल्यही प्रथम 10.87 लाख कोटी रुपयांच्या घरात पोहोचल्याची नोंद केली आहे. याच दरम्यान देशातील दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बाजारमूल्याच्या तुलनेत टीसीएसचे बाजारमूल्य 1.63 लाख कोटी रुपयांनी कमी राहिल्याची नोंद मुंबई शेअर बाजारात करण्यात आली आहे.
याचा प्रभाव म्हणून गुंतवणूकदारांनी टीसीएसच्या समभागांची खरेदी करण्यात आपला सहभाग दाखविला आहे. यामुळे सध्या खुला केलेला बायबॅकच्या घोषणेचाही लाभ येत्या काळात कंपनीला होणार आहे.
बायबॅकवर करणार खर्च
बाजारमूल्याचा आधार घेत बायबॅक प्रोग्रॅमवर टीसीएस बाजारमूल्यातील जवळपास 1.5 टक्के खर्च करणार असल्याची माहिती आहे. गुरुवारी टीसीएसचे समभाग 2838 रुपयांच्या मूल्यावर बंद झाले आहेत.









