मुंबई
कोरोना महामारीने अनेक कंपन्यांची परिस्थिती बिघडवली असून ज्यामुळे कंपन्यांना कर्मचारी कपात करण्याचे धोरण राबवावे लागते आहे. असे जरी असले तरी एचसीएल कंपनीने मात्र येणाऱया काळात 15 हजार जणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार असल्याचे म्हटले आहे. आयटी क्षेत्रातल्या कंपन्या पहिल्या तिमाहीत उत्तम कामगिरी बजावत असून भरतीवर भर देतील, असे दिसते आहे.
कंपनीने जूनच्या तिमाहीत 31 टक्के वाढीव नफा मिळवला आहे. हा नफा 2 हजार 925 कोटी रुपये होता तर याच तुलनेत मागच्या वर्षी समान कालावधीतला नफा 2 हजार 220 कोटी रुपये होता. सध्या कंपनीचे चेअरमनपद शिव नाडर यांची कन्या रोशनी नाडर हिच्याकडे सोपववण्यात आले आहे. वयाच्या 38 व्या वर्षी महत्त्वाचे पद तिने खांद्यावर घेतले आहे. कंपनी येणाऱया काळात विविध कॅम्पसमधून 15 हजार जणांना भरती करून घेणार आहे, असे समजते. नोकरीचा शोध घेणाऱया नव्या व्यवस्थापन पदवीधरांना यामुळे रोजगाराची संधी चालून येणार आहे. काही दिवसांपूर्वी टीसीएसने 40 हजार जणांना भरती करून घेण्याचे जाहीर केले होते. दुसरीकडे जानेवारीत विप्रोने 12 हजार जणांना भरती करण्याचे सांगितले होते.
आयआयएम पदवीधरांना 15 ते 20 लाखाचे पॅकेज
आयआयएम, अहमदाबाद, बेंगळूर आणि कोलकाता, आयएसबी, एक्सएलआरआय तसेच एसपी जैन या संस्थांच्या व्यवस्थापन पदवीधरांना वेतनरुपात 20 ते 23 लाख रुपयांचे सर्वाधिक वार्षिक पॅकेज मिळते. आयआयएम, कोझीकोड, इंदूर तसेच लखनऊच्या व्यवस्थापन पदवीधरांना कंपन्या वार्षिक 15 ते 18 लाख रुपये पॅकेज देतात. तर इतर महाविद्यालयाच्या पदवीधरांना पात्रतेनुसार कंपन्या 4.5 लाख ते 7 लाखाचे पॅकेज देत असतात.









