अभिनेता किरण माने हे म्हणतात, ’पत्नीकडून चपात्या बनवायला शिकलो’
विशाल कदम / सातारा
कोरोना विषाणूच्या संकटामुळे सर्वच टीव्हीवरील सिरियलचे कलाकार स्टे होम आहेत. त्यामुळे टीव्हीवर चालू एपिसोड सध्या बंद असून जुनेच भाग दाखवले जातात. तर टीव्ही सिरियलचे कलाकार ही त्यांच्या कुटूंबात रंगल्याचे दिसत आहे. शूटिंगमधून आणि चाहत्यांच्या गराडय़ातून आपल्या कुटूंबाला वेळ न देणारे हे कलाकार सध्या कुटूंबातच रंगून आहे. कोण पती, कोण मुलं, कोण पत्नी, आई यांच्यासह, त्यांच्याबरोबर आपला वेळ घालवत आहेत. ‘तरुण भारत’ने अभिनेता किरण माने यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘मी चपाती लाटायला माझ्या पत्नीकडून शिकलो. चपतीचा गोल येण्यासाठी एक कलाच असते, असे त्यांनी सांगितले.
इतरांचं मनोरंजन करणारे चित्रपट, नाटक आणि रोज टीव्हीवर लागणाऱया धारावाहिक मालिकांमध्ये काम करणारे अभिनेत्री, अभिनेता यांना इतरवेळी शूटिंग आणि त्यांच्या चाहत्यांच्या गराडय़ातून वेळ मिळत नसतो. काही कलाकार तर घरात आपल्या कोण काय करतय कसे राहतात हेही माहिती नसते. एवढे नेहमी चित्रीकरणात व्यस्त असतात. मात्र, सध्याच्या कोरोनाच्या विळख्यात लॉकडाऊन केले गेले आहे. त्यामुळे सर्वच चित्रीकरण बंद आहेत. कलाकार मंडळी आपल्या कुटूंबातले रंगले आहेत. दररोज टीव्हीवर लागणाऱया जीव तुझ्यात रंगला, मन हे बावरे, माझ्या नवऱयाची बायको, मिसेस मुख्यमंत्री, डॉक्टर डॉन, लग्नाची बायको वेडिंगचा नवरा, अगोबाई सासूबाई, बाळूमामाच्या नावानं चांगभलं, चला हवा येऊ द्या, राजा राणीची गोष्ट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रेमाचा गेम सेम टू सेम गोष्ट अशा अनेक मालिका दररोज टीव्हीवर लाखो प्रेक्षक पाहत असतात. त्यामध्ये दररोज होणारे त्यांचे शूटिंग ठराविक ठिकाणी चालत असते. मात्र, सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतेक सर्वच मालिकांचे चित्रीकरण बंद आहे. कलाकार हे त्यांच्या कुटुंबात होम स्टे घेत आहेत.
सातारा जिह्यातील अनेक कलाकार हे धारवाहिक मालिकांमध्ये काम करतात. मग अभिनेत्री किरण ढाणे असेल किंवा अभिनेता किरण माने असतील. एवढेच नव्हे तर जिह्यातील काही गावात मिसेस मुख्यमंत्री या मालिकेचे चित्रीकरण होत होते. सध्या हे कलाकार आपल्या कुटुंबामध्ये रंगले आहेत.
चपात्या लाटायला शिकलो
कोरोनामुळे एक चांगली गोष्ट झाली ती म्हणजे आम्ही सगळे घरात आहोत. एकमेकांशी सवांद वाढलाय. एकमेकांविषयी खूप जाणून घेता येतंय. आपण म्हणत असतो की कुटुंबातला संवाद संपला आहे पण कोरोनाच्या भीतीने कलाकाराचे कुटूंब जवळ आले. मी माझी मुलं आयुष आणि इशा या दोघांनाही बाल साहित्य वाचायला देतो. मी ही वाचन करतो. माझ्याकडे खूप पुस्तक आहे. व्यकंटेश माडगूळकर, द. मा. मिरासदार या ग्रामीण साहित्यीकांची, विजय तेंडुलकर, महेश कुंचलवार, किरण येलें या नाटककारांची, किशोर कदम, दास वैध आदी कवींची पुस्तक आहेत. दुपारी वाचन करतो आम्ही सर्व कुटूंबातले सदस्य. वेळा ठरवून घेतल्या आहेत. सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतो. चांगल्या चांगल्या पोस्ट फेसबुकवर शेअर करतो. माझी पत्नी ललिता हिच्याकडून मी चपात्या लाटायला शिकलो. मला आता कळतंय की घरातलं काम किती अवघड असते ते. आपण बाहेर जातो. कष्ट करतो पैसा कमावतो पण आपल्या घरात आपले गृहमंत्री काय करतात हे कधी जाणत नाही. एखाद्या मल्टीनशनल कंपनीच्या सीईओच्या ज्या जबाबदाऱया असतात त्या सर्व आपल्या घरातील महिला सांभाळत असतात. आपण जरी आज घरात सगळे असलो तरीही घरातील ती मात्र गप्प बसलेली नाही. सगळ्यांच्या चहा, नास्टा, औषध पहात असतात. काय संपलं काय नाही हे पहात असतात. मी चपाती लाटायला शिकलो. चपतीला गोल आणून ती पक्की भाजणे ही एक कलाच आहे, असा मनमोकळा संवाद त्यांनी साधला.








