1 पैसा ते दीड रुपया प्रती महिना वाढ शक्य
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
विविध टीव्ही वाहिन्या त्यांच्या दरांमध्ये 10 ते 15 टक्के वाढ करणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे टीव्ही पाहणे काहीसे महाग होण्याची शक्यता आहे. टीव्ही रीचार्ज करण्याचा दर आता अधिक होण्याची शक्यता आहे. मात्र, ही दरवाढ त्वरित लागू होणार नसून फेब्रुवारीपासून होणार असल्याचे समजते.
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राई) माहितीनुसार देशातील 42 प्रसारक आपल्या वाहिन्यांच्या दरात वाढ करणार आहेत. तीन वर्षांनी ही वाढ होत आहे. सोनी पिक्चर्स, स्टार इंडिया आणि झी एंटरटेनमेंट यांसह काही लोकप्रिय प्रसारण कंपन्यांचा यांच्यात समावेश आहे. या प्रसारण कंपन्यांच्या वाहिन्यांची संख्या 330 हून अधिक आहे. या वाहिन्या पाहण्यासाठी प्रसारण कंपन्यांकडून दर महिन्याला विशिष्ट रक्कम दर्शकांकडून घेतली जाते. ही किंमत प्रति वाहिनी 10 पैशांपासून 19 रुपयांपर्यंत आहे. या रकमेत 10 ते 15 टक्के, अर्थात 1 पैसा ते 1.50 रुपये वाढ होण्याची शक्यता आहे, अशी माहिती देण्यात आली.
ट्राईकडून नियमांमध्ये सुधारणा
ट्राईकडून प्रसारण कंपन्यांच्या नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे एमआरपीची मर्यादा 12 रुपयांवरुन 19 रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. यानंतर झी एंटरटेनमेंट, कल्यर मॅक्स एंटरटेनमेंट आणि सन टीव्ही नेटवर्क नव्या रेफरन्स इंटरकनेक्ट ऑफर (आरआयओ) सादर केली आहे. त्यामुळे त्यांच्या दरात किरकोळ वाढ होणार आहे. इतरही प्रसारण कंपन्या अशाच प्रकारे काही प्रमाणात वाढ करणार आहेत. त्यांनी अद्याप आरआयओ सादर केलेले नाहीत.
फेब्रुवारी पासून नवे दर
टीव्ही वाहिन्यांचे नवे दर पुढील वर्षाच्ज्या फेब्रुवारी महिन्यापासून लागू होणार आहेत. त्यामुळे तेव्हापासून दर्शकांना काही प्रमाणात जास्त पैसे द्यावे लागतील. ज्या वाहिन्या विनामूल्य दाखविल्या जातात त्यांच्यात काही फरक पडणार नाही. सध्या ज्या वाहिन्यांचा मासिक दर 10 पैसे आहे, त्या वाहिन्यांसाठी 11 पेसे द्यावे लागण्याची शक्यता आहे. सर्वाधिक दरवाढ सोनीच्या एका वाहिनीची होणार असून सध्या या वाहिनीचा दर 31 रुपये आहे. तो वाढीनंतर 43 रुपये होण्याची शक्यता आहे. झी नेही आपल्या हिंदी चित्रपट दाखविणाऱया वाहिनीचा दर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे स्टार कंपनीही दरवाढ करणार आहे.
दरवाढीचे कारण काय
साधारणतः 3 वर्षांनी वाहिन्यांच्या दरांमध्ये सुधारणा केली जाते. त्यामुळे पुढील वर्षी ही वाढ होणार आहे. ही वाढ ग्राहकांना डोईजड होऊ नये याची दक्षता ट्राई ही संस्था घेत असते. सध्या प्रसारण कंपन्यांचा खर्च वाढल्याने त्याची भरपाई करण्यासाठी दरवाढ केली जाणार आहे. ज्या वाहिन्या सध्या अतिशय कमी दरात उपलब्ध आहेत, त्यांचे दर 10 ते 15 टक्के वाढले तरी फारसा फरक पडणार नाही. तथापि, ज्या वाहिन्या महाग आहेत त्या आणखी महाग होणार आहेत.









