हैदराबाद / प्रतिनिधी
तेलगू देसम पक्षाचे नेता गुज्जल श्रीनिवासुलू यांच्या घरी आणि ऑफिसमध्ये सीबीआयने छापा मारला. यावेळी सीबीआयला करोडो रुपयांची संपत्ती असल्याचे आढळून आले. सीबीआयने गुज्जल यांच्या निवासस्थानी आणि ऑफिसवर शुक्रवारी छापा टाकला. गुज्जल हे आप्को (स्टेट हँडलूम वीवर्स कोऑपरेटीव्ह सोसायटी) चे माजी अध्यक्ष आहेत.
काही दिवसांपूर्वीच हैदराबादमध्ये एका तहसीलदाराच्या घरावर छापा टाकला असता यावेळी मोठी घबाड सापडले होते. तर आंध्र प्रदेशमधील अनंतपूरच्या कोषागार (treasury) विभागाच्या कर्मचाऱ्याकडेही मोठ्या प्रमाणावर सोने, चांदी, पैसे सापडले होते. या आठवड्यातील ही तिसरी रेड आहे.
सीबीआयने गुज्जल श्रीनिवासुलू यांच्या खाजीपेट येथील घरी आणि कार्यालयावर छापा टाकला. यावेळी तीन किलो सोने, दोन किलो चांदी, एक कोटींपेक्षा अधिक रोख रुपये आणि मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. याशिवाय 10 लाख रुपयांच्या जुन्या नोटादेखील हैदराबादच्या घरातून जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच १० लाख रुपयांच्या नव्या नोटाही सापडल्या आहेत.
तीन किलो सोन्यामध्ये करोडो रुपयांच्या किंमतीचे दागिने, हारही जप्त करण्यात आले आहेत. सीबीआयने सध्या ही संपत्ती जप्त केली आहे. याचबरोबर करोडो रुपयांच्या सोन्याच्या, जडजवाहिर असलेल्या बांगड्याही जप्त करण्यात आल्या आहेत.