क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
हुबळी येथे टीडब्ल्यूएस चषक संघटना हुबळी आयोजित 15 वर्षाखालील नॉर्थ कर्नाटका बॅडमिंटन स्पर्धेत बेळगावच्या नताशा कनगुटकरने एकेरीच्या अंतिम सामन्यात ट्वींकल हिचा 2-1 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत नताशा कनगुटकरने हुबळीच्या भाग्यलक्ष्मीचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत नताशाने तनुश्रीचा 21-12, 21-7 असा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात नताशा कनगुटकरने ट्वींकलला कडव्या लढतीत 22-20, 13-21, 23-21 अशा गेम्सनी हरवून विजेतेपद पटकाविले. तिला मान्यवरांच्या हस्ते चषक, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. नताशा ही कांड्स बॅडमिंटन अकादमी, टिळकवाडी येथे सराव करत असून तिला एनआयएस प्रशिक्षक लक्ष्मीकांत नेतलकर यांचे मार्गदर्शन तर वडील नितीन कनगुटकर यांचे प्रोत्साहन लाभत आहे.









