डेहरादून / वृत्तसंस्था
मागील दोन-तीन दिवसांपासून देशभरात उत्तराखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तीरथसिंग रावत यांचे वादग्रस्त वक्तव्य गाजत आहे. रावत यांच्यावर सर्वच स्तरांतून टीका होत असतानाही त्यांनी आपली भूमिका कायम ठेवली आहे. वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना, आपला महिलांनी जीन्स वापरण्याला विरोध नाही, पण फाटक्या जीन्स वापरण्याला आपला कायमच विरोध असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रावत यांच्या विवादित विधानाचा राज्यसभा खासदार जया बच्चन यांनीही समाचार घेतला आहे. ‘एका मुख्यमंत्र्यांना असे विधान करणे शोभत नाही. मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसलेल्या लोकांनी काहीही बोलण्याआधी विचार करायला हवा. लोकांच्या कपडय़ांवरून तुम्ही त्यांची संस्कृती ठरवणार आहात का?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.









