किरण ठाकुर यांचे प्रतिपादन : लोकमान्य सोसायटीतर्फे टिळक पुण्यतिथी : स्वातंत्र्यसैनिकांचा इतिहास अभ्यासक्रमातून वगळला जात असल्याची खंत
प्रतिनिधी /बेळगाव
एकोणीसाव्या शतकातील युगपुरुष म्हणून लोकमान्य टिळकांचा उल्लेख केला जातो. बाळ गंगाधर टिळक हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. त्यांची दूरदृष्टी आजही आम्हाला प्रेरणा देत आहे. उत्तम पत्रकार, हाडाचे शिक्षक, वक्ते, जहाल नेते, समाज सुधारक अशा विविध अंगांनी त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात देशभरात स्फुल्लिंग चेतविले. टिळकांचे स्वातंत्र्य हे ध्येय होते, तर आजच्या पिढीसमोर बलवान राष्ट्र हे ध्येय असले पाहिजे, असे प्रतिपादन लोकमान्य को-ऑप. सोसायटीचे संस्थापक व चेअरमन किरण ठाकुर यांनी केले.
लोकमान्य को-ऑप. सोसायटीच्यावतीने रविवारी भाग्यनगर येथील सोसायटीच्या सभागृहात लोकमान्य टिळकांच्या 101 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. किरण ठाकुर पुढे म्हणाले, लोकमान्य टिळकांच्या विचारांच्या प्रेरणेतूनच लोकमान्य सोसायटी उभी राहिली. लोकमान्य सोसायटीची 100 वी शाखा टिळकांच्या वाडय़ात सुरू करण्यात आली. त्यांचे पणतू शैलेश टिळक यांच्या सहकार्याने हे सर्व शक्मय झाले. ज्याप्रकारे लोकांचा टिळकांवर विश्वास होता तोच विश्वास घेऊन लोकमान्य सोसायटी प्रगती करत असल्याचे त्यांनी सांगितले.
सहकाराचा पाया टिळकांनी रोवला
जोवर समाज एकवटणार नाही तोवर कोणताच लढा यशस्वी होणार नाही हे टिळकांच्या लक्षात आल्याने त्यांनी सार्वजनिक शिवजयंती व गणेशोत्सव सुरू केला. लोक एकत्र आले तरच आपली प्रगती साधू शकतात हे त्यांनी या उत्सवाच्या माध्यमातून दाखवून दिले. टिळक हयात असताना स्वातंत्र्य मिळाले असते तर देशाची प्रगती अजून दुप्पट वेगाने झाली असती, असे विचार किरण ठाकुर यांनी मांडले.
संचालक अनिल चौधरी म्हणाले, टिळक हे जहाल असल्याने तत्कालिन राजकारण्यांनी त्यांना बाजूला केले. राजकारण्यांच्या या कृतीमुळे देशाचे मोठे नुकसान झाले. टिळक आपल्या लेखणीतून प्रहार करत असल्याने ते कारागृहातून बाहेर पडताच त्यांच्यावर दुसरा गुन्हा दाखल करण्यासाठी ब्रिटिशांची धडपड सुरू असायची. स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक यांच्यासारख्या स्वातंत्र्यसैनिकांचा इतिहास शालेय पुस्तकांमधून वगळला जात आहे. हा इतिहास पुढील पिढीपर्यंत शिकविला गेला नाही तर हा देश नेस्तनाबूत होईल, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
प्रारंभी उपस्थित संचालक मंडळाच्यावतीने टिळकांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी लोकमान्य सोसायटीचे संचालक पंढरी परब, प्रभाकर पाटकर, अजित गरगट्टी, सीईओ अभिजित दीक्षित, कर्नल दीपक गुरुंग, रिजनल मॅनेजर एम. एन. कुलकर्णी, असिस्टंट रिजनल मॅनेजर सी. आर. पाटील यांच्यासह इतर अधिकारीवर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक विनायक जाधव यांनी केले. यावेळी लोकमान्य परिवारातील सदस्य उपस्थित होते.









