प्रतिनिधी / बेळगाव
खिडकी तोडून घरात प्रवेश केलेल्या सात दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून दीड लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना गुरूवारी पहाटेच्या सुमारास घडली.
तोंडावर मास्क परिधान केलेल्या अज्ञात सात जणांनी तिसरे रेल्वेगेट ते राणा प्रताप रोडवरील घरात शिरून मोठा दरोडा घालण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्यांनी 35 ग्रॅम सोन्याचे दागिने घेऊन पलायन केले. या घटनेमुळे या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तिसरे रेल्वेगेटनजीक अभिजित सामंत यांच्या घरी हा प्रकार घडला असून घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱयांनी पाहणी केली. उद्यमबाग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दरोडा घालण्याच्या हेतूने गुरूवारी पहाटे सामंत यांच्या घरच्या खिडकीचे गज तोडून सात जणांनी आत प्रवेश केला. यावेळी त्यांनी चाकूचा धाक दाखवून सोन्याची अंगठी, कर्णफुले आणि महिलेच्या गळय़ातील गंठन असे एक लाख 65 हजार रूपये किंमतीचे 35 ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक दयानंद शेगुनशी यांनी घटनास्थळी धाव घेतले. श्वानपथक व ठसे तज्ञांना पाचारण करून पंचनामा केला. खडेबाजार पोलिस स्थानकाचे एसीपी चंद्रप्पा यांनी देखील याठिकाणी भेट दिली. याप्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.