प्रतिनिधी / बेळगाव
मान्सूनपूर्व पावसामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचून रस्त्यावर खड्डे पडल्याने चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे वाहनधारकांना खड्डय़ांतून-चिखलातून वाट काढावी लागत आहे. टिळकवाडी येथील पहिले रेल्वेगेटनजीकच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. शनिवारी झालेल्या दमदार पावसाने या खड्डय़ांमध्ये पाणी साचून राहिले होते.
रविवारी विकेंड कर्फ्यू असल्याने नागरिक घरीच होते. सोमवारी सकाळी नागरिक खरेदीसाठी बाहेर पडले. त्यावेळी पहिल्या रेल्वेगेटनजीक पडलेल्या खड्डय़ांमुळे पादचाऱयांना आणि वाहनधारकांना चिखलाचा सामना करावा लागला. यावेळी चिखलात अनेक वाहने घसरून पडण्याचे प्रकारदेखील घडले. तसेच वाहनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे पावसाळय़ापूर्वी हा मार्ग खड्डेमुक्त करावा, अशी मागणी होत आहे.









