वेळेत कचऱयाची उचल करून स्वच्छता राखण्यात महानगरपालिका अपयशी : आरोग्य धोक्मयात; नागरिकांमधून नाराजी

प्रतिनिधी /बेळगाव
संपूर्ण शहरातील कचऱयाची वेळेवर उचल करून स्वच्छता करण्यात येत असल्याचा दावा महापालिकेचे अधिकारी करीत असतात. मात्र हा दावा फोल ठरला असून बाजारपेठेव्यतिरिक्त कचऱयाची उचल केली जात नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवरील कचऱयाकुंडय़ा स्वच्छ तर उपनगरांतील रस्त्यांवर कचऱयाचे ढिगारे यामुळे रस्त्यांना कचराडेपोचे स्वरूप आले आहे.
शहराच्या स्वच्छतेसाठी पंचवीस कोटीहून अधिक निधी खर्चूनही बाजारपेठेव्यतिरिक्त अन्य ठिकाणी स्वच्छता ठेवण्यास महापालिकेच्या आरोग्य विभागाला अपयश आले आहे. कचऱयाची उचल वेळेवर केली जात असल्याचा दावा करणारे आरोग्य विभागाचे अधिकारी कार्यालयात बसून पाहणीदौरा करीत आहेत का? असा मुद्दा ऐरणीवर आला आहे. स्वच्छतेसाठी महापालिकेने कंत्राट दिले आहे. मात्र कंत्राटदाराकडून व्यवस्थित स्वच्छता करवून घेण्यास महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांना आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांना अपयश आले आहे. यामुळे उपनगरांमध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. शहरात एकीकडे रोगराईचा फैलाव होत आहे. यामुळे स्वच्छता ठेवण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे. तर दुसरीकडे सार्वजनिक ठिकाणी साचलेल्या कचऱयाची उचल करून स्वच्छता राखण्यात महापालिकाच अपयशी ठरली आहे. शहरातील कचऱयाची उचल वेळेवर करण्याची सूचना महापालिका आयुक्तांनी केली होती. पण या सूचनेकडेही कंत्राटदारांनी कानाडोळा केला असल्याने अस्वच्छता पसरली आहे.
टिळकवाडी परिसर स्वच्छ आणि उचभ्रू वस्तीचा असल्याचे सांगण्यात येते. पण शुक्रवारपेठेमधून बुधवारपेठेत जाणाऱया कॉर्नरवर मातीचे ढिगारे आणि शेणाचे ढिगारे साचले आहेत. यामुळे रस्ता पूर्णतः बंद झाला आहे. परिसरात कचरा आणि शेणाचे ढिगारे साचल्याने दुर्गंधी पसरली असून नागरिकांना ये-जा करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परिसरात राहणाऱया नागरिकांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
भंगीबोळातही कचऱयाचे साम्राज्य
तसेच नानावाडी, आगरकर रोड, व्हॅक्सिन डेपो परिसरातील रस्त्याशेजारी आणि भंगीबोळात कचऱयाचे साम्राज्य निर्माण होऊन कचराकुंडय़ा बनल्या आहेत. काही ठिकाणी रस्त्यांच्या बाजूला ठेवण्यात आलेले कंटेनर कचऱयाने भरून वाहत आहेत. कचरापुंडय़ांमधील कचऱयाची उचल व्यवस्थित करून जंतुनाशक पावडर मारणे आवश्यक आहे. मात्र कचऱयाची उचल केली जात नाही. तसेच कचरा टाकण्यात येणाऱया परिसरात पावडर मारण्यात येत नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. तसेच वाऱयामुळे प्लास्टिक पिशव्यांचा कचरा सर्वत्र पसरत आहे. महापालिकेच्या अधिकाऱयांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.









