अपघाताच्या घटना; खड्डा त्वरित बुजविण्याची नागरिकांची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरातील विविध रस्त्यांचा विकास करण्यात येत आहे. या अंतर्गत टिळकवाडी परिसरातील रस्त्यांवर पेव्हर्स घालून रस्ते स्मार्ट बनविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र रस्त्याशेजारी खोदण्यात आलेले खड्डे वाहनधारकांना अडचणीचे ठरत असून दुचाकी वाहनांचे अपघात होत आहेत. धोकादाय खड्डय़ामुळे शनिवारी रात्री दोन दुचाकी वाहने पडली असल्याच्या घटना निदर्शनास आल्या आहेत.
टिळकवाडीतील विविध पेठेतील रस्त्यांचा विकास करण्यात येत आहे. रस्त्याशेजारी गटारीचे बांधकाम करून पेव्हर्स घालून सुसज्ज रस्ते बनविण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत निधीची तरतूद करण्यात आली आहे. ठिकठिकाणी हे काम सुरू असून, पेव्हर्सचा वापर करण्यात येत आहे. मंगळवारपेठेतील रस्त्यावर पेव्हर्स घालून विकास करण्यात येत आहे. रस्त्यावर पेव्हर्स घालण्याचे काम पूर्ण झाले असून, काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला खोदण्यात आलेले खड्डे अद्यापही बुजविण्यात आले नाहीत. याठिकाणी खड्डय़ाशेजारी पेव्हर्स ठेवण्यात आल्याने वाहतुकीस अडथळा ठरत आहे. खड्डे बुजविण्यात यावेत, अशी सूचना स्मार्टसिटी कंपनीच्या अधिकाऱयांना केली होती. पण याकडे दुर्लक्ष केल्याने वाहनांचे अपघात घडत असून शनिवारी रात्री दोन वाहने घसरून पडल्याची घटना निदर्शनास आली आहे. त्यामुळे वाहनधारकांना धोकादायक ठरणारे खड्डे तातडीने बुजविण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.