ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
टिकटॉक आणि वी-चॅट या लोकप्रिय चिनी अॅपवर बंदी घालणाऱ्या सरकारी आदेशावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली. टिकटॉक आणि वी-चॅट या अॅपमुळे देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
अमेरिकेत टिकटॉक आणि वी-चॅट या अॅपवर 45 दिवसांच्या आत बंदी घालण्यात यावी, असे या आदेशात म्हटले आहे. टिकटॉक आणि वी-चॅट हे दोन्ही अॅप अविश्वासू आणि देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक आहेत. देशातील अर्थव्यवस्थेला या अॅपमुळे धोका असल्याने ही बंदी घालण्यात आली आहे, असे या सरकारी आदेशात म्हटले आहे.
यापूर्वी सीनेटने अमेरिकेतील कर्मचाऱ्यांच्या टिकटॉक वापरण्यावर बंदी घालणाऱ्या आदेशाला मान्यता दिली होती. दरम्यान, भारताने राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत पहिल्यांदा टिकटॉकसह 106 चिनी अॅपवर बंदी घातली. त्यानंतर अमेरिकेनेही चीनला दणका दिला.









