वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येथे नुकत्याच झालेल्या 50 व्या मिशन ऑलिंपिक सेलच्या बैठकीमध्ये टार्गेट ऑलिंपिक पोडियम स्कीम (टीओपीएस) मध्ये टोकियो ऑलिंपिक स्पर्धेसाठी जाणाऱया भारताच्या चार मुष्टीयोद्धय़ांचा समावेश करण्यात आला आहे.
2018 च्या विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धेत कास्यपदक विजेती सिमरनजीत कौर (60 किलो गट), पुजा राणी (75 किलो गट), आशिश कुमार (75 किलो पुरूष विभाग), सतीश कुमार (पुरूष (91 किलो वरील गट) यांचा टार्गेट ऑलिंपिक पोडियम स्कीम (टीओपीएस) मध्ये समावेश करण्यात आला आहे. या चारही मुष्टीयोद्धय़ांनी गेल्या मार्चमध्ये जॉर्डन येथे झालेल्या आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत टोकियो ऑलिंपिकचे तिकीट निश्चित केले आहे. 2012 च्या ऑलिंपिक स्पर्धेतील कास्यपदक विजेती तसेच सहावेळा विश्व विजेतेपद मिळविणारी महिला मुष्टीयोद्धा एमसी मेरी कॉमने टार्गेट ऑलिंपिक पोडियम स्कीममध्ये आपले स्थान राखले आहे. एकूण सहा मुष्टीयोद्धय़ांनी या टीओपीएसमधील आपले स्थान राखले आहे. कविंदर सिंग बिस्त, अमीत पांघल, मनिष कौशिक, विकास कृष्णन, लवलिना बोर्गेहेन, निखत झरीन, सोनिया चहल आणि शिवा थापा यांचा समावेश आहे.









