प्रतिनिधी / कोल्हापूर :
महापालिकेला उद्योजक व्हि.बी. पाटील यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून दिलेली शववाहिका टायर खराब झाल्याने बंद आवस्थेत आहे. कोरोना मृतदेहांची संख्या वाढली असून शववाहिकेवरील ताण कमी करण्यासाठी तात्काळ टायर बदलून शववाहिका सुरू करण्याची मागणी माजी नगरसेवक तौफीक मुल्लाणी यांनी महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना दिले आहे.
कोरोनाच्या पहील्या लाटेत कोरोना मृतदेहांची वाढलेल्या संख्येमुळे महापालिकेकडे शववाहीका कमी पडत होत्या. यामुळे आमदार फंडातून दोन शववाहिका मिळाल्या तर अयोध्या ग्रुपचे व्ही बी पाटील यांनी एक शववाहिका महापालिकेला दिली होती. पहिल्या लाटेत या शववाहिकेमुळे महापालिकेवरील ताण कमी झाला. शेकडो मृतदेह पंचगंगा स्मशानभूमीमध्ये नेऊन दहन करण्यात आले.
दुसरी लाट सुरू झाली असून रोज 50 पेक्षा जास्त कोरोना रूग्णांचा मृत्यू होत आहे. असे असताना कावळा नाका येथे सध्या ही शववाहिका टायर खराब झाल्याने बंद आहे. इतर शववाहिकेवर ताण वाढला आहे. तात्काळ टायर बदलून शववाहीका सुरू करण्याची मागणी नगरसेवक मुल्लाणी यांनी केली आहे. दरम्यान, महापालिकेचे अग्निशमन दलाचे प्रमुख रणजित चिले यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधला असता ते म्हणाले, टायर खराब झाल्यामुळे दोन दिवसांपासून शववाहिका बंद ठेवली आहे. लवकरच टायर खरेदी केली जाणार असून शववाहिका सेवेत असेल.









