वृत्तसंस्था/ विजेक ऍन झी (हॉलंड)
येथे सुरू असलेल्या टाटा स्टील पुरस्कृत मास्टर्स खुल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रॅण्ड मास्टर विदित गुजराथीने सहाव्या फेरीअखेर गुणवारीत चार गुणांसह संयुक्त आघाडी मिळविली. सहाव्या फेरीमध्ये विदित गुजराथी आणि आर. प्रग्यानंद यांनी आपले डाव अनिर्णीत राखले.
स्पर्धेच्या सहाव्या फेरी अखेर गुणतक्त्यात विदित आणि पोलंडचा डुडा, नॉर्वेचा कार्लसन, ग्रॅण्डमास्टर मेमीडेरेव्ह हे प्रत्येकी 4 गुणांसह संयुक्त आघाडीवर राहिले. भारताच्या प्रग्यानंदने अमेरिकेच्या सॅम शेंकलँडला सहाव्या फेरीत बरोबरीत रोखले. प्रग्यानंदने 2.5 गुण नोंदविले आहेत. टॉप सीडेड बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनने या स्पर्धेत आपला दुसरा विजय नोंदविताना सहाव्या फेरीतील लढतीत रिचर्ड रेपोर्टचा पराभव केला. कार्लसनने 4 गुणांसह संयुक्त आघाडी मिळविली.
मेमीडेरेव्हने सहाव्या फेरीतील आपला सामना बरोबरीत राखून 4 गुण नोंदविले आहेत. सहाव्या फेरीच्या लढतीमध्ये डुडाने काळय़ा मोहरा घेवून खेळताना गुजराथीला बरोबरीत राखले. प्रग्यानंद आणि अमेरिकेचा शेंकलँड यांच्यातील सामना 21 चालीनंतर बरोबरीत सुटला. ग्रॅण्डमास्टर सर्जी किर्जेकेनने या स्पर्धेत आपला पहिला विजय मिळविताना फॉरेस्टचा पराभव केला. अनिश गिरीने केरूनाचा पराभव करत पूर्ण गुण वसूल केला.
या स्पर्धेतील चँलेजर्स विभागात भारताचा 18 वर्षीय ग्रॅण्डमास्टर अर्जुन इरिगेसीने सुर्यशेखर गांगुलीचा 42 व्या चालीत पराभव करत 5.5 गुणांसह आघाडीचे स्थान मिळविले. या विभागात अन्य दोन स्पर्धक चार गुणांसह संयुक्त दुसऱया स्थानावर आहेत.









