2.5 टक्क्यांची वाढ शक्यः कच्च्या मालासह अन्य किमती वाढल्याचा परिणाम
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पुढील वर्ष हे गाडी खरेदी करणाऱयांसाठी धक्का देणारे असणार आहे. कारण अनेक कंपन्या आपल्या उत्पादनांच्या किंमती वाढवणार आहेत. देशातील वाहन निर्माती कंपनी टाटा मोटर्स आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किमती 1 जानेवारीपासून वाढविण्याच्या तयारीत असून जवळपास ही वाढ 2.5 टक्क्यांची राहणार असल्याचे संकेत आहेत. दिवसागणिक वाढत जाणाऱया कच्च्या मालाच्या किमती आणि अन्य घटकांच्या वाढणाऱया किमतीमुळे हा निर्णय घेतला असल्याचेही टाटा मोर्ट्सने यावेळी स्पष्ट केले आहे.
कंपनीने सोमवारी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार वाणिज्य वाहनांच्या किमती वाढविण्याचा निर्णय घेतला असून यामध्ये मध्यम व अवजड व्यावसायिक वाहने, मध्यम व हलकी व्यावसायिक वाहने, लहान व्यावसायिक वाहने आणि बसच्या किमती वधारणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.
कंपनीचे स्पष्टीकरण
स्टील, ऍल्युमिनिअम आणि अन्य बहूमूल्य धातुंच्या किमती वाढल्यासोबत दुसऱया बाजूला कच्च्या मालाच्या किमती वाढत असल्याच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्याचे टाटा मोटर्सकडून सांगण्यात आले आहे. तसेच या अगोदर मारुती, मर्सिडीज बेंझ आणि ऑडीने पुढील महिन्यापासून वाहनांच्या किमती वाढविण्याची घोषणा केली असल्याची माहिती आहे.
होंडा, रेनॉही वाढवणार किंमती
दरम्यान टाटासह पुढील वर्षी जानेवारीपासून अन्य कंपन्याही आपल्या कार्सच्या किमती वाढवणार आहेत, असे कळते. यात होंडा व रेनॉ कंपनीचाही समावेश आहे. जानेवारी 2022 पासून अंतर्गत खर्चात झालेल्या वाढीच्या प्रित्यर्थ किंमती वाढवल्या जाणार असल्याचे कंपन्यांनी स्पष्ट केले आहे.









