लियांडर पेसलाही मिळण्याची शक्यता, प्रज्नेश, सुमितला थेट प्रवेश
वृत्तसंस्था/ मुंबई
पुण्यात होणाऱया टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत आयोजकांनी रामकुमार रामनाथनला पुरुष एकेरीत वाईल्डकार्ड प्रवेश दिला आहे. त्याचप्रमाणे अनुभवी लियांडर पेसला दुहेरीत वाईल्डकार्ड प्रवेश दिला जाण्याचीही शक्यता आहे.
भारताचे एकेरीतील दोन अव्वल टेनिसपटू प्रज्नेश गुणेश्वरन व सुमित नागल यांनी मात्र कामगिरीच्या आधारे थेट मुख्य ड्रॉमध्ये स्थान मिळविले आहे. 25 वर्षीय रामकुमार भारताच्या या एकमेव एटीपी 250 टेनिस स्पर्धेत तिसऱयांदा खेळताना दिसणार आहे. 3 फेब्रुवारीपासून या स्पर्धेला प्रारंभ होत आहे. ‘एकेरीसाठी एकूण तीन वाईल्डकार्ड दिले जाणार असून त्यापैकी एक रामकुमारला देण्यात आले आहे. अन्य दोघांबद्दल आम्ही अद्याप निर्णय घेतलेला नाही,’ असे स्पर्धा संचालक प्रशांत सुतार म्हणाले. या स्पर्धेत पहिल्यांदाच भारताच्या दोन खेळाडूंनी थेट प्रवेश मिळविला आहे. ही स्पर्धा एखादा आशियातील किंवा भारतीय खेळाडूने जिंकावी, अशी आमची इच्छा आहे, असेही ते म्हणाले.
सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार, लियांडर पेसने आपले हे शेवटचे वर्ष असल्याचे जाहीर केले असून त्याने या स्पर्धेतील दुहेरीसाठी वाईल्डकार्ड देण्याची विनंती केली आहे. त्याचा आम्ही सकारात्मक विचार करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतून लवकर बाहेर पडलेल्या काही खेळाडूंनी येथील स्पर्धेत वाईल्डकार्ड देण्याची विनंती केली असून त्यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल, असे एमएसएलटीएचे अध्यक्ष भारत ओझा म्हणाले.
आश्चर्याची बाब म्हणजे गेल्या वर्षी रोहन बोपण्णा व दिविज शरण यांनी दुहेरीचे जेतेपद मिळविले होते. पण यावेळी ते येथे एकत्र खेळणार नाहीत. बोपण्णानेही वाईल्डकार्डची मागणी केली असून तो पुण्याच्या अर्जुन कढेसमवेत दुहेरीत खेळणार आहे. याशिवाय पुरव राजा रामकुमारसमवेत खेळणार आहे. एन.जीवन व एन. बालाजी यांनीही वाईल्डकार्ड प्रवेशाची मागणी केली आहे. त्यामुळे आयोजकांसमोर वाईल्डकार्ड देण्याबाबत पेच निर्माण झाला आहे. कारण दुहेरीसाठी केवळ दोघांना वाईल्डकार्ड प्रवेश दिला जातो.