ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
संसदेची नवीन इमारत उभारण्याचे कंत्राट टाटा उद्योग समूहाने मिळवले आहे. संसदेची नवीन इमारत पार्लमेंट हाऊसच्या प्लॉट नंबर 118 वर उभी राहणार आहे. त्यासाठी 861.90 कोटी रुपये खर्च येणार आहे.
भारताच्या जुन्या संसदेच्या बाजूलाच सेंट्रल व्हिस्टा रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टच्या अंतर्गत नवीन संसद बांधण्यात येणार आहे. त्या इमारतीच्या बांधकामासाठी कंत्राट मिळवण्यासाठी शापुरजी, लार्सन अँड टुब्रो, पालनजीसारख्या एकूण सात कंपन्या शर्यतीत होत्या. त्यामध्ये टाटा समूहाने सर्वात कमी बोलून हे कंत्राट मिळवले.
या इमारतीच्या निर्मितीसाठी अंदाजे 21 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. संसदेच्या पावसाळी अधिवेशनानंतर नव्या संसद भवनाच्या उभारणीचे काम सुरू होणार आहे. तर 2022 मध्ये भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी हे काम पूर्ण होईल, असे सांगण्यात येते.









