वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टाटा मोटर्सने अलीकडेच सीएनजी कारच्या विक्रीमध्ये येणाऱया काळात लक्षणीय वाढ होणार असल्याचे म्हटले आहे. आगामी तीन ते पाच वर्षाच्या कालावधीमध्ये एकूण सर्व प्रकारातील कार विक्रीमध्ये सीएनजी इंधनावरील कार्सचा वाटा हा 20 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो, असेही भाकीत कंपनीने वर्तवले आहे. कंपनीच्या एका अधिकाऱयाच्या मते, पेट्रोल व डिझेलच्या कारला पर्याय म्हणून सीएनजी इंधनावरील कारसाठी ग्राहकांचा ओढा वाढतो आहे. सीएनजी आधारित वाहनांच्या मागणीमध्ये सध्याच्या काळातही वाढ राहणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. सध्या इलेक्ट्रिक कारबाबतही ग्राहक जागरुक असून या गटातही अनेक कंपन्यांची वाहने आगामी काळात दाखल होणार आहेत.

दुसरीकडे मात्र सीएनजी आधारित वाहनांना मागणी वाढणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. देशामध्ये सीएनजी स्टेशनच्या संख्येमध्ये वाढ होत असून ती जर त्वरेने वाढली तर सीएनजी कार्स खरेदी करणाऱयांची संख्याही पर्यायाने वाढणार आहे. सध्याच्या घडीला पाहता कार विक्रीमध्ये डिझेल इंधनावरील कारची विक्री 15 टक्के इतकी आहे. दुसरीकडे पेट्रोल आणि सीएनजी वाहनांच्या विक्रीचा वाटा अनुक्रमे 66 आणि 12 टक्के आहे तर उर्वरीत टक्केवारी ही इलेक्ट्रिक वाहनांमध्ये नोंदली जाईल.
पुढील तीन ते पाच वर्षाच्या कालावधीमध्ये पेट्रोलवर आधारित वाहनांची टक्केवारी पन्नास टक्क्यांवर घसरु शकते.









