टाटा मोर्ट्सचे अध्यक्ष चंद्रशेखरन यांची माहिती – पर्यावरण संरक्षणावर देणार भर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टाटा मोर्ट्स 2025पर्यंत देशातील उत्पादनामध्ये वाटा उचलताना नवीन दहा इलेक्ट्रिक वाहनांचे (ईव्ही) सादरीकरण करण्याची योजना बनवत आहे. यामध्ये कंपनी येणाऱया कालावधीत आपल्या वाहन व्यवसायात स्वच्छ ऊर्जा असणाऱया वाहनांच्या निर्मितीला प्राधान्य देणार आहे.
कंपनीने समभागधारकांना माहिती देताना म्हटले आहे, की टाटा मोर्ट्सचे ध्येय स्वच्छ ऊर्जा असणाऱया वाहनांच्या निर्मितीमध्ये जगातील प्रमुख कंपनी बनण्याचे आहे. यातूनच हरित वाहनांसाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात येत आहेत.
भारतामध्ये आमची पोर्टफोलियामध्ये ईव्हीची हिस्सेदारी ही चालू वर्षात दुप्पट होत दोन टक्क्यांच्या घरात पोहोचली आहे, अशी माहिती चंद्रशेखरन यांनी 2020-21 च्या वार्षिक अहवालामध्ये दिली आहे. यासोबतच टाटा मोर्ट्स भारतीय बाजारात या बदलाचे नेतृत्व करणार असून येत्या 2025 पर्यंत जवळपास 10 नवीन ईव्ही वाहनांचे सादरीकरण केले जाणार असल्याचे नमूद केले आहे.
बॅटरी निर्मितीचे संकेत
या व्यतिरिक्त टाटा समूह बॅटरीचा सुरक्षित पुरवठा करण्यासाठी भारतासह युरोपमध्ये बॅटरीची विक्री आणि निर्मितीला सक्रिय स्वरुपात भागीदारीच्या शोधात असल्याचे टाटाने सांगितले आहे.









