नॅनोचा नवा लूक पाहून रतन टाटा यांनी व्यक्त केले समाधान
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टाटा मोर्ट्सने सर्वसामान्य लोकांसाठी कारची सुविधा उपलब्ध व्हावी याच्यासाठी नॅनो कार बाजारात आणली होती. परंतु दरम्यानच्या काळात या कारला बाजारात म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे अखेर या मॉडेलचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला. मात्र आता हिच कार नव्या रुपात पुन्हा रस्त्यावर धावणार आहे.
सदरची कार ही रतन टाटा यांची ड्रीम कार असून कंपनीने तिला नवा लूक देत इलेक्ट्रिक मॉडेलमध्ये सादर करण्याचे ठरवले आहे. या बदललेल्या नॅनोमध्ये बसून प्रवास करत रतन टाटा यांनी आनंद व्यक्त केला आहे. नव्या बदलासोबतची नॅनो ग्राहकांच्या पसंतीस कितपत उतरणार हे पाहणे गरजेचे राहणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी पॉवरट्रेन बनविणारी कंपनी इलेक्ट्रा ईव्ही यांनी नव्या नॅनो कारला इलेक्ट्रिक रुप दिले आहे. कंपनीने स्वतःच याबाबतची माहिती लिंक्डइनवर दिली आहे.
कंपनीने म्हटले आहे, की नॅनोचा नवा लूक हा संस्थापक रतन टाटा यांना सर्वाधिक पसंत पडला असून त्यांनी नॅनो ईव्हीमधून फेरफटका मारत आनंद व समाधान व्यक्त केले आहे. तसेच 72 व्हि नॅनो ईव्ही डिलिवर करणे आणि बदल्यात ग्राहकांकडून प्रतिक्रीयाही मिळवणे ही बाब अभिमानाची व गर्वाची राहणार असल्याचे रतन टाटा यांनी यावेळी म्हटले आहे.
टाटा नॅनो ईव्हीची रेंज 160 किमी
नॅनो ईव्हीची 4 सिट असणारी कार असून यांची रेंज ही 160 किलोमीटरपर्यंत राहणार आहे. तसेच ही कार 10 सेकंदाच्या कालावधीत शून्य ते 60 किमी प्रति तास वेगाने धावणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यामध्ये लिथियम आर्यन बॅटरीचा वापर करण्यात आला आहे.









