पानात अन्न टाकू नये, अशी शिकवण आपल्याला लहानपणापासून मिळालेली असते. ‘खाऊन माजा, पण टाकून माजू नका’ अशी म्हणही आपण ऐकलेली असते. तथापि, पानात अन्नपदार्थ टाकण्याची बहुतेकांना सवय असते. यामुळे किती हानी होत आहे, याचा आपण विचारही करत नाही. आपल्यासाठी टाकलेले अन्न अतिशय थोडे असते. तथापि, अशा अन्नाचे जगभरातील प्रतिदिन प्रमाण प्रचंड आहे. एका सर्वेक्षणात असे दिसून आले आहे, की भारतातले प्रत्येक कुटुंब दरवषी 50 किलो अन्नपदार्थ पानात टाकण्याच्या सवयीमुळे वाया घालवतात.
हा प्रश्न केवळ अन्न वाया जाण्याचा नाही. टाकण्याच्या या सवयीमुळे पर्यावरणाचीही प्रचंड हानी होते. जणू हे एक पृथ्वीसाठी असलेले संकटच आहे. अन्न टाकण्याची सवय केवळ भारतातच आहे असे नव्हे. शास्त्राrय दृष्टीकोन असलेल्या पाश्चात्य नागरिकांनाही ती आहे. तिथे तर समृद्धीमुळे अन्नाची नासाडी जास्त प्रमाणात केली जाते, असे दिसून आले आहे.
पर्यावरणावर याचा नेमका कसा परिणाम होतो, यावर तज्ञांनी उद्बोधक प्रकाश टाकला आहे. खाद्यान्नाचे उत्पादन वाढावे म्हणून अनेक आशियाई देशांमध्ये वनांची कत्तल केली जाते. वनजमिनीचे शेतजमिनीत रूपांतर करून तेथे धान्याची लागवड केली जाते. यामुळे पृथ्वीच्या वातावरणात मोठे बदल घडून येत आहेत. तापमान वाढत आहे. वनांचा संहार झाल्याने निसर्गाचा समतोल ढासळला आहे. अन्नधान्याचे उत्पादन वाढले असले तरी अन्न टाकण्याच्या सवयीमुळे हे वाढीव उत्पादन फुकट जाते, असा दुहेरी तोटा अन्न टाकण्याच्या सवयीमुळे सर्वांना सहन करावा लागतो, असे तज्ञांचे म्हणणे आहे. आपल्याला हवे तेवढेच वाढून घेऊन ते सर्व अन्न संपविण्याची खबरदारी पृथ्वीवरील सर्व 700 कोटी माणसांनी घेतल्यास पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महत्त्वाचे सहकार्य होऊ शकेल. पृथ्वीवर दरवषी जवळजवळ 1 कोटी 30 लाख टन भोजन वाया घालविले जाते. हे भोजन तयार करण्यासाठी जी ऊर्जा वापरावी लागते, तीही त्यामुळे फुकट जाते. अशा प्रकारे पानात टाकण्याची सवय अनेक प्रकारे मानवजातीचा आणि पर्यावरणाचा घात करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पानात टाकू नका, हा संस्कार सर्वांनीच गांभीर्याने घेण्याची आवश्यकता पर्यावरण तज्ञांनी व्यक्त केली आहे.









