केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा इशारा
@ रत्नागिरी-
रत्नागिरी- पुष्कळ मसाला आहे. वहिनीवर ऍसिड फेकायला कोणी सांगितले, यासह अनेक अनेक गोष्टी मला माहिती आहेत. टप्याटप्याने मी प्रकरणे बाहेर काढणार. दादागिरी करू नका, तो तुमचा पिंड नाही. मी होतो तिथे 39 वर्षे. नको त्या वाटेत जाऊ नये, पुन्हा एकदा मी खणखणीत वाजवणार, असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला.
रत्नागिरी भाजप कार्यालयात आयोजित सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. शिवसेना औषधालाही सापडणार नाही, असे सांगून यावरसुद्धा केस करतील, अशी खिल्ली उडवली. आमच्या घरावर हल्ला करणाऱया वरुण सरदेसाईला अजून अटक झाली नाही. त्याला पोलीस बंदोबस्त असूनही तिथल्या मुलांनी चोपला. तो परत आला तर परत जाणार नाही. आम्ही सोडणार नाही. तो जमा करून आणतो, त्याची वट म्हणून अटक झाली नसेल, असेही राणे यांनी सांगितले.
राणे पुढे म्हणाले की, जनआशीर्वाद यात्रेला भाजप कार्यकर्त्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय. रात्री एकेक वाजेपर्यंत लोक 6 ते 7 तास वाट पाहत थांबले होते. हे भाग्य त्यांच्या नशिबी नाही. पूर्वी घडलेल्या घटनेवर पत्रकारमित्रांनी प्रश्न विचारला. बोललो मी. त्यावेळी मी तिथे असतो तर आवाज आला असता, असतो तर ना. पण दरोडेखोराला अटक करतात तसे केंद्रीय मंत्र्याला अटक करायला 200 पोलीस काय पराक्रम आहे. महाराष्ट्रात सर्व जनता त्रस्त आहे. शेतकऱयांना कर्जमाफी मिळाली नाही. चिपळूण, महाड पूरस्थितीत भरपाई मिळाली नाहीये. या साऱयाचा अहवाल मी पंतप्रधान मोदीजींकडे देणार आहे.
जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन म्हणाले, गेली 20 वर्षे भाजपने सतत पराभव बघितला आहे. परंतु दादांच्या रूपाने आज हक्काचा, आमचा माणूस मिळाला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना नवीन ऊर्जा मिळाली आहे. तुमच्या येण्यामुळे भाजपला नक्कीच चांगले दिवस येणार आहेत. गेल्या अनेक वर्षांचा वनवास आता संपणार आहे, आम्ही नक्की जिंकू. कार्यकर्ते उत्साहीत आहेत. आता आम्ही भाजपच्या विजयासाठी निवडणूक लढवू. यावेळी भाजप कार्यालयात भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण, आमदार आशिष शेलार, भाजप उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड, भाजप जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन आदी पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी राणे यांचा सत्कार ऍड. दीपक पटवर्धन आणि तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे यांनी केला. युवामोर्चातर्फे सत्कार जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन व नंदू चव्हाण यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका सरचिटणीस तथा नगरसेवक उमेश कुळकर्णी यांनी केले. राणे यांच्या भाषणानंतर विविध संस्थांनी राणे यांचा सत्कार केला आणि विविध प्रकारची निवेदने सादर केली.
यावेळी आमदार प्रसाद लाड म्हणाले की, आता ही जनआशीर्वाद यात्रा थांबणार नाही. येणारा काळ भाजपचाच आहे. नारायण राणे यांच्या केंद्रीय उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून अनेक उद्योजकांना संधी मिळणार आहे. तसेच आता दादांच्या जन आशीर्वाद यात्रेमुळे भाजपचा नवीन उदय होईल.
आमदार आशिष शेलार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचारपूर्वक मंत्रिमंडळ बनवले आणि दादांकडे महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. गेली अनेक वर्षे कॉंग्रेसने गरिबी हटावचे अनेक कार्यक्रम केले पण गरिबी काही हटली नाही. परंतु मोदीजींनी अनेक योजना आणल्या असून प्रत्येक घरात पिण्याच्या पाण्याचा नळ, वीज जोडणी, उज्ज्वला गॅस योजना अशा 26 योजना सुरू केल्याने घराघरांत समाधान व्यक्त होत आहे. जनआशीर्वाद यात्रेत खोडा घालण्याचे काम या ठाकरे सरकारने केले आहे. उध्दव ठाकरेंची शिवसेना नेहमीच कोकणच्या विरोधात आहे. कोकणला काही मिळाले की नेहमीच त्यांच्या पोटात दुखते. नारायण राणे मुख्यमंत्री झाले तेव्हाही त्यांच्याविरोधात ठाकरेंनीच षडयंत्र केले. शिवसेनेतच मंत्री सुरेश प्रभू यांना अपमानास्पद वागणूक दिली गेली. रत्नागिरी ही लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, शामराव पेजे अशा दिग्गजांची भूमी आहे. यंदा गणेशोत्सव रद्द झाला आहे. टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला तो ठाकरे सरकारने बंद पाडला. लोकमान्य हे असंतोषाचे जनक होते. परंतु उध्दव ठाकरे हे महाराष्ट्राच्या असहिष्णुतेचे जनक आहेत.









