डॉ. देवीशेट्टी नेतृत्त्वाखालील समितीची राज्य सरकारला शिफारस : तिसरी लाट टाळण्यासाठी उपाययोजनेची सूचना
प्रतिनिधी /बेंगळूर
कोरोनामुळे बंद झालेली शाळा-महाविद्यालये टप्प्याटप्प्याने सुरू करावीत आणि कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी त्वरित उपायोजना हाती घेण्यासह शाळेत हजर होणाऱया प्रत्येक मुलाचा 2 लाखांचा आरोग्य विमा उतरविण्याची शिफारस डॉ. देवीशेट्टी नेतृत्त्वाखालील समितीने राज्य सरकारला केली आहे. कोरोना तिसऱया लाटेच्या टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. देवीशेट्टी यांच्या नेतृत्त्वाखालील समितीने मंगळवारी गृहकार्यालय कृष्णामध्ये मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्याकडे 92 पानांचा अहवाल सुपूर्द केला.
अहवालात प्रामुख्याने डॉ. देवीशेट्टी समितीने कोरोनाच्या तिसऱया लाटेचा मुलांवर गंभीर परिणाम होणार असल्याने आतापासूनच खबरदारीच्या उपाययोजना हाती घेण्याचा सल्ला दिला आहे. येत्या जुलै महिन्यापासून तीन टप्प्यात शाळा-महाविद्यालये सुरू करण्याची सूचना समितीने केली आहे. पहिल्या टप्प्यात पदवी, पदवीपूर्व, व्यावसायिक कोर्स सुरू करावेत. शिक्षण संस्थांनी शाळा सुरू न केल्यास मुलांच्या बौद्धिक क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी शाळा-महाविद्यालये सुरू न केल्याने शिक्षण व्यवस्था ढासळली आहे.
मुले कोरोना योद्धे नाहीत
दुसऱया टप्प्यात आठवी ते दहावी आणि तिसऱया टप्प्यात पाचवी ते सातवी पर्यंतच्या शाळा उघडाव्यात. सध्याच्या परिस्थितीत नर्सरी आणि पहिली ते चौथीपर्यंत शाळा सुरू करू नयेत. तसेच शाळा-महाविद्यालये सुरू करण्याचा अधिकार स्थानिकांना द्यावेत, अशीही शिफारस समितीने केली आहे. मुलांमध्ये कोरोना संसर्ग आढळून आल्यास तात्काळ तशा शाळा बंद कराव्यात. कोरोनामुळे कोणत्याच मुलाचा मृत्यू झालेला नाही. याचबरोबर मुले कोरोना योद्धे नाहीत, असा उल्लेखही अहवालात केला आहे.
सर्व शाळेतील शिक्षक, साहाय्यिका, वाहन चालकांचे लसीकरण करणे बंधनकारक आहे. प्रत्येक मुलांना मास्क आणि सॅनिटायझर वापरण्याची सूचना केली आहे. याचबरोबर शाळेत पिण्यासाठी गरम पाण्याची व्यवस्था करावी. मुलांना ऑनलाईन व्यवस्था आणि शाळेला येण्याचे बंधन नको. पालकांची अनुमती घेऊन हजेरी बंधनकारक न करता वर्ग सुरू करावेत. शाळेत गैरहजर राहणाऱया विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास परवानगी द्यावी, असे सांगितले आहे.
विद्यार्थी स्वतः शाळेत येण्यासारखे वातावरण निर्माण करावे. तिसरी लाट मुलांवर अधिक प्रभावी असल्याने त्यांच्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे. प्रत्येक जिल्हा आणि तालुका केंद्रावरील रुग्णालयात मुलांसाठी विशेष वॉर्ड सुरू करणे बंधनकारक आहे. मुलांना घेऊन येणारे वाहन दररोज दोनवेळा सॅनिटाईज करावे. शाळा आवाराच्या आजूबाजूला मुलांना कोणतेच खाऊ मिळू नये याकडे अधिक लक्ष द्यावे. मुले आणि मुलींना स्वतंत्र खोलीत बसवावे. तसेच खोली दररोज सॅनिटाईज करावी. प्रत्येक बाकावर दोन मुलांना बसवून किमान पाच ते 6 फुटांचे अंतर असणे गरजेचे आहे. शक्य असल्यास कोविड केअर सेंटर सुरू करावे, असा सल्लाही समितीने दिला आहे.
राज्यात 3 हजार मुलांमागे एक डॉक्टर
सध्या राज्यात 3 हजार मुलांमागे एक डॉक्टर आहे. याचे प्रमाण हजारापर्यंत वाढवावे. एकूण लोकसंख्येत 2.3 टक्के 18 वर्षांखालील मुले आहेत. यापैकी 1 टक्के मुलांना कोरोनाची बाधा होऊ शकते. तसेच तीव्र स्वरुप प्राप्त झाले तर 3 लाख मुलांना संसर्गाची लागण होऊ शकेल. मुलांना घरातील सदस्यांपासूनच संसर्ग होण्याची शक्यता असल्याने पहिल्यांदा मुलांवर उपचार करावेत, असे समितीने स्पष्ट केले आहे.
सध्या शाळा सुरू करण्याचा विचार नाही : मुख्यमंत्री

राज्यात टप्प्याटप्प्याने शाळा-महाविद्यालये सुरू करण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे. सध्या पहिली ते दहावी पर्यंत शाळा सुरू करणार नाही, असे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी स्पष्ट केले. डॉ. देवीशेट्टी नेतृत्त्वाखालील समितीचा अहवाल स्विकारून त्यावर चर्चा करून ते पत्रकारांशी बोलत होते. सध्या शाळा सुरू करण्याबाबत विचार केलेला नाही. परंतु पदवी, अभियांत्रिकी, वैद्यकीय वर्ग सुरू करण्याबाबत पुढील दिवसात निर्णय घेतला जाईल. शाळा सुरू करण्याबाबत चर्चा झालेली नाही. सर्व शिक्षकांसह 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण झाल्यानंतर महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.









