झोळंबेतील माऊली मंदिरासाठी कावी कलेचा कल्पकतेने वापर : ब्राझीलच्या संशोधकांकडून संशोधन सुरू
तेजस देसाई / दोडामार्ग:
आंतरराष्ट्रीय ख्यातीचा वारसा संवर्धन चळवळीतील हेतापंडित यांनी आपल्या ‘ग्रडिंग स्टोरीज फ्रॉम गोवा’ या इंग्रजी पुस्तकासाठी झोळंबे येथील माऊली मंदिराच्या कावी कलेच्या संचिताचा कल्पकतेने वापर केलेला आहे. त्याची दखल ब्राझील देशातल्या संशोधन पत्रिकांनी घेतलेली आहे. 300 वर्षापेक्षा जास्त झालेल्या या माऊली मंदिरात असलेली कावी कलेतील चित्र असल्याचे समोर आले आहे. ती टिकवणे व संवर्धनाचे प्रयत्न केले तर हा वारसा भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, असे ज्येष्ठ पर्यावरण व लोकसंस्कृती अभ्यासक प्रा. राजेंद्र केरकर यांनी सांगितले.

कावी कलेविषयी माहिती देताना पर्यावरण व लोकसंस्कृती अभ्यासक प्रा. राजेंद्र केरकर म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रात दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे गाव आजमितीस कावी कलेसाठी प्रसिद्ध असलेल्या माऊली मंदिरातील प्रसिद्धीस पावलेला आहे. एकेकाळी महाराष्ट्रातील कुडाळ येथे कर्नाटकातील कारवार प्रांतापर्यंत कावी कलेचा वारसा मिरवणारी असंख्य मंदिरे या परंपरेची साक्ष देत होती. परंतु दक्षिण भारतातल्या भव्यदिव्य मंदिराच्या वास्तुशिल्प रचनेच्या मोहापायी येथील प्रादेशिक पारंपरिक लोककला भूमिपुत्रांना तिचे महत्त्व आकलन न झाल्याने कावी कला संकटग्रस्त झालेली आहे. दोडामार्ग तालुक्यातच नव्हे तर सिंधुदुर्गात वेंगुर्ला, कुडाळ, सावंतवाडी या परिसरातील मंदिरे कावी कलेचा वारसा मिरवत होती. पेडणे तालुक्यातील गवंडी त्याचप्रमाणे गोवा कोकणात स्थायिक असलेले च्यारी, सुतार, मेस्त्राr आणि कारवार येथील गुढीधर ही पारंपरिक कुटुंबे कावी कलेत प्रवीण होती. कोकणातील मान्सूनात होणारी पर्जन्यवृष्टी आणि दमट हवामान यांच्या संकटामुळे रासायनिक रंगकाम टिकत नसतानाही सध्या या रंगाचे आकर्षण आणि नव्या वास्तूकलेतील मोहिनी समाजावर पडलेली आहे. या कलेत माहीर असणाऱया कारागिरांनी जमिनीत आढळणाऱया वैशिष्टपूर्ण मातीत खुबे, तिसऱया सारख्या माशांपासून तयार केलेला चुना, आंबवलेले गूळ आणि तसेच उपलब्ध वाळू यांच्यापासून तयार केलेले मिश्रण आठवडय़ानंतर व्यवस्थित कुजवून त्याचा वापर मंदिरावर रंगकाम करण्यासाठी केला. अशी तांबडय़ा रंगाने रंगवलेली या कलेतील मंदिरे गेल्या तीनशे वर्षांपासून नाना प्रकारच्या नैसर्गिक प्रकोपाना सामोरे जात समर्थपणे उभी राहिली. कावी कलेवर माधवचार्यांनी वैष्णवधर्माचे जे संस्कार केले त्याचा विलक्षण प्रभाव जाणवतो. त्यामुळे ‘विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म’ ही यशोपताका खांद्यावर घेऊन कावी कलाकारांनी या कलेच्या कोंदणात शिरपेच खोवला. कर्नाटकातील शिरसीचे मरीक्कम्पा, अंकोल्याचे महामायेचे, पेडणे येथील मूळविटाचे, चोपडेतील वेताळाचे, डिचोली अडवल पाल येथील मारुतीचे मंदिर, कावी कलेमुळे नावारुपास पावले. परंतु गेल्या पाव शतकापासून या मंदिरांना भाविकांनी केलेल्या जीर्णोद्धारापायी कावी कलेचे वैभव हाहा म्हणता विकोपाला पोहोचले. त्यामुळे कावी कला व त्यातली पारंपरिकता संकटग्रस्त झाली. कर्नाटकातील कारवार, महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग आणि पेडणेतील बऱयाच मंदिरात कावी कला लोप पावली. यातल्या काही मंदिराच्या व्यवस्थापन समितीने कावी कलेचे महत्त्व समजल्या कारणाने पारंपरिक शैलीला फाटा देऊन रासायनिक रंगाच्या आधारे कलेचे वैभव जोपासण्याचा प्रयत्न केला. अशा या प्रतिकूल कारणामुळे गोवा, महाराष्ट्र, कर्नाटकात यामध्ये दोडामार्ग तालुक्यातील झोळंबेतील माऊली मंदिर मैलाचा दगड ठरले आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी झोळंबे ग्रामवासीय कमिटी कार्यरत झाली आहे. अशा पार्श्वभूमीवर माऊली मंदिरातील गर्भगृह आणि सभामंडपातील खांब भिंती आदींवरती असलेली कावी कलेतील चित्रे टिकवण्याचा नितांत गरज निर्माण झाली आहे. या चित्रात भगवान श्रीकृष्णाच्या बाललीला, लक्ष्मीनारायणाचे गरुडावरती विराजमान, नाग आणि गरुड यांच्या पारंपरिक संघर्ष, चतुःरस्त्र गणपती त्याचप्रमाणे या परस्परांच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक वस्तूंचे वैविध्यपूर्ण चित्रण या कलेने केलेले आहे.









