पार्थिव दफन प्रश्न : माठेवाडा येथील रहिवाशांचा : प्रांताधिकाऱयांवर आरोप
प्रतिनिधी / सावंतवाडी:
माठेवाडा येथील श्री देव दामोदर भारती मठात दफन केलेले श्रीकृष्ण गिरी यांचे पार्थिव हटविण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे सादर करण्यासाठी माठेवाडय़ातील रहिवासी प्रांताधिकारी सुशात खांडेकर यांच्याकडे शनिवारी गेले होते. परंतु खांडेकर झोपल्याचे कारण पुढे करून त्यांची भेट नाकारण्यात आली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न असताना खांडेकर यांनी झोपेमुळे भेट नाकारली. खांडेकर यांच्या या कृतीचा रहिवाशांनी पत्रकार परिषद घेऊन निषेध केला. आता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रांताधिकारी त्याला जबाबदार राहतील, असा इशारा रहिवाशांनी दिला.
येथील आत्मेश्वर मंदिरात झालेल्या पत्रकार परिषदेला प्रभागातील नगरसेवक आनंद नेवगी, शुभांगी सुकी, उत्कर्षा सासोलकर, माजी नगरसेवक देवा टेमकर, रहिवासी अरुण वझे, आनंद मोघे, नंदू गावडे, किरण सिद्धये, बाळा चोणकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे वकील ऍड. समी खाजा आदी उपस्थित होते.
येथील माठेवाडय़ात गिरी कुटुंबयांनी श्रीकृष्ण गिरी यांच्या पार्थिवाचे देव दामोदर भारती मठात दफन केले. रहिवाशांचा त्याला विरोध आहे. यासंदर्भात त्यांनी पालिका मुख्याधिकारी, प्रांताधिकारी, पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन पार्थिव हटविण्याची मागणी केली. मात्र, अद्यापही ते हटविण्यात आलेले नाही. यापूर्वी असा प्रसंग उद्भवला होता. त्यावेळी आपल्यासारखा निवाडा झाला. त्यानुसार पार्थिव हटवावे, यासाठी रहिवासी प्रांताधिकारी खांडेकर यांना भेटण्यास गेले होते. त्यावेळी मी झोपलो आहे. निवेदन स्वीकारणार नाही, असा निरोप रहिवाशांना मिळाला. त्यामुळे रहिवासी परत आले. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन खांडेकर यांच्या या कृतीचा निषेध केला. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न असताना
प्रांताधिकाऱयांनी भेट देणे आवश्यक होते. परंतु त्यांनी भेट नाकारली. ही त्यांची कृती योग्य नसल्याचे आनंद नेवगी, पुंडलिक दळवी यांनी सांगितले. पार्थिव हटविण्यासंदर्भात रविवारी सकाळी अकरा वाजता मुख्याधिकारी, नगराध्यक्ष घटनास्थळी येणार असल्याचे नेवगी यांनी सांगितले.
गिरी हे केवळ पुजारी!
यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे वकील समी खाजा यांनी गिरी कुटुंबियांची कृती बेकायदेशीर आहे. त्यांना पार्थिव हटविण्याबाबत नोटीस दिली आहे. देवस्थान समिती यासंदर्भात काही करू शकत नाही. प्रांताधिकारी, मुख्याधिकारी पार्थिव हटविण्याबाबत निर्णय घेऊ शकतात. गिरी हे केवळ पुजारी होते. परंपरेने ते मठाधिपती नाहीत. देवस्थान समितीची जागा आहे. या जागेत पार्थिव दफन करता येणार नाही. यापूर्वीच्या न्यायनिवाडय़ाच्या आधारे पार्थिव येथून हटविणे आवश्यक आहे, असे खाजा यांनी सांगितले. अशी घटना यापुढे घडू नये, यासाठी समितीतर्फे बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
…तर प्रशासन जबाबदार!
पार्थिव दफन केल्याने आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. येथे त्यांना पार्थिव दफन करता येणार नाही. ते हटविले पाहिजे. तसे न झाल्यास होणाऱया परिणामांना प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा रहिवाशांनी दिला. प्रांताधिकाऱयांनी वेळीच निर्णय घेतला नाही. त्यामुळे प्रकरण चिघळले, असे रहिवाशांनी सांगितले.









