विशाल कदम/ सातारा
शहराच्या हद्दीत आता नव्याने आलेल्या माजगावकर माळावरील झोपडपट्टीतील नागरिकांना हक्काचे घर देण्यासाठी खासदार उदयनराजेंनी प्रधानमंत्री आवास योजनेचा नारळ फोडला. त्या योजनेच्या कामालाही सुरु झाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये एक नव्हे तब्बल 1958 जणांना हक्काचे घर मिळणार आहे. म्हणजे एक छोटेखानी गावच वसवले जाणार असून 8 एकर जागेत घरकुलासाठी 7 मजली 14 इमारती होणार आहेत. त्यामध्ये अंगणवाडी, पोलीस ठाण्याकरता जागा देण्यात येणार आहे. तसेच दुकान गाळे आणि सोलर लाईटही उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
गेल्या कित्येक पिढय़ा आकाशवाणी झोपडपट्टी, माजगावकर माळ हा भाग त्रिशंकू भाग म्हणून ओळखला जात होता. या भागाला कोणी वाली नव्हता. येथे रहात असलेले नागरिकांना आरोग्याच्या सुविधा, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा कोणत्याही स्वरुपाच्या नव्हत्या. दररोज कचराकुंडी, लगतच असणारी हागणदारी. तेथेच अजूनही तब्बल 300 ते 400 कुटुंबे झोपडपट्टीमध्ये राहतात. सोबत समस्या घेऊन हे नागरिक तसेच आपले पिढय़ान् पिढय़ाचे आयुष्य काढत आहेत. परंतु नुकतीच गतवर्षी हद्दवाढ झाली अन् नव्याने हद्दीत हा भाग आला. खासदार उदयनराजेंनी या भागातल्या नागरिकांना शहरात ज्याप्रकारे घरकुल योजना राबवली त्याचप्रकारे घरकुले बांधण्याची योजना प्रधानमंत्री आवास योजना मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी पाठपुरावा करुन आणली. त्या योजनेचा नारळही फुटला अन् कामाला सुरुवात झाली. त्यामुळे येथील झोपडपट्टीत राहणाऱयांना आता हक्काचे घर मिळणार आहे. तेही प्लॅट मिळणार असल्याने आनंद होत आहे.









