प्रतिनिधी / सातारा :
50-60 वर्ष कष्ट करून उभी केलेली घरे अचानक स्थलांतरीत करण्याबाबत नोटीसा आल्याने शुक्रवारी कुष्टरोगी झोपडपट्टीतील नागरिकांनी सातारा नगरपालिकेत धाव घेतली. यावेळी अधिकाऱ्यांच्या केबीनमध्ये एकच गोंधळ निर्माण झाला. यावेळी नागरिकांनी कोणतीही पूर्व कल्पना नाही, योजनेची माहिती नाही, नव्या जागेत सोयी-सुविधांचा अभाव असल्याने स्थलांतरण कसे करायचे असा प्रश्न अधिकारी व कर्मचाऱ्यांना केला. त्यावर कोणतेही ठोस उत्तर न देता अधिकाऱ्यांनी यातून काढता पाय घेत सोमवार दि.14 रोजी परिसराची पुन्हा पाहणी करणार असल्याचा विश्वास नागरिकांना दिला.
या झोपडपट्टी परिसरातील नागरिकांच्या मुलभूत अधिकारांचे संरक्षण व्हावे आणि नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय स्थलांतरित करण्यात येऊ नये, या मागणीसाठी कुष्टरोगी वसाहत नागरी अधिकार समितीच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.