ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
रशिया आणि युक्रेनमधील युद्धाची धग पाचव्या दिवशीही तीव्र आहे. युद्धादरम्यान रशियाने युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या हत्येसाठी पाठवलेल्या चेचेन स्पेशल फोर्सचा युक्रेनच्या सैन्याने खात्मा केला आहे. डेली मेलने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
रशियातील चेचेन सशस्त्र गट हा क्रूर हिंसाचार आणि मानवी हक्कांच्या उल्लंघनासाठी कुप्रसिद्ध आहे. रशियाने युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या हत्येची जबाबदारी या गटाकडे सोपवली होती. मात्र, युक्रेनच्या सैन्याने धैर्याने या तुकडीसह 56 टँक उद्धवस्त केले. कीव्हच्या ईशान्येकडील हॉस्टोमेलजवळ त्याच्या 56 टँकचा ताफा युक्रेनियन क्षेपणास्त्राने उडवला आहे. त्यामुळे या गटातील किती सैनिक मारले गेले याची माहिती समोर आलेली नाही. परंतु ही संख्या शेकडोंमध्ये असण्याची शक्मयता वर्तवण्यात येत आहे.
सध्या किव्हजवळच्या हॉस्टोमीलमध्ये रशियन सैन्य आणि युक्रेनच्या लष्करामध्ये जोरदार संघर्ष सुरु आहे. या ठिकाणी रशिया हवाई हल्ले करत असून दुसरीकडून युक्रेन त्याला उत्तर देताना दिसत आहे.