कोरोनासंबंधी पंतप्रधानांनी घेतली आढावा बैठक : हर्षवर्धन, एस. जयशंकर यांचीही बैठकीस हजेरी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतात कोरोना संसर्गाची प्रकरणे दररोज वाढत आहेत. आतापर्यंत 34 संशयित सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सतर्क झाले असून त्यांनी शनिवारी आरोग्यमंत्र्यांसह या विभागातील महत्त्वाच्या अधिकाऱयांची विशेष बैठक घेतली. या बैठकीत कोरोनाशी झुंज देण्यासाठी सतर्क राहण्याच्या आणि आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी केंद्रीय मंत्र्यांसह कोरोना विषाणूबद्दल आढावा बैठक घेतली. या बैठकीला केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर, आरोग्य राज्यमंत्री अश्वनी कुमार चौबे आणि संबंधित विभागांचे उच्च अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पंतप्रधानांना कोरोना रोखण्यासाठी व संक्रमित लोकांच्या उपचारांसाठी कोणती पावले उचलली गेली हे सांगितले गेले.
सध्या देशात पुरेशी औषधे, सक्रिय औषधी घटक (एपीआय) आणि इतर उपयुक्त पदार्थांचा साठा उपलब्ध आहे. कोरोनावरील या महत्त्वपूर्ण बैठकीत सर्व देशातील विमानतळ, बंदरे आणि इतर देशांना जोडणाऱया रस्ते यांचे निरंतर दक्षता आणि देखरेखीचा आढावा घेण्यात आला. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी कोरोनाशी लढा देण्यासाठी राज्यांशी प्रभावी समन्वय साधण्याची गरज व्यक्त केली. भारतीयांना इराणमधून हाकलून लावण्यासंबंधीच्या मुद्यावरही यावेळी विचारविमर्ष करण्यात आला.
पंतप्रधान मोदींनी बैठकीमध्ये कोरोनासंदर्भात विविध मंत्रालयांनी केलेल्या कामांचे कौतुक केले. त्याचबरोबर त्यांनी प्रत्येकाला कोरोनाविरुद्धच्या लढाईत निष्काळजीपणाने वागू नका आणि कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार राहण्यास सांगितले. हे संक्रमण रोखण्यासाठी जागरुकता आणि सावधगिरीवर भर देण्यात यावा, असा सल्ला पंतप्रधानांनी दिला.
जनजागृती करण्याचे निर्देश
देशातील विविध राज्यांत तातडीने कोरोनाने संक्रमित रुग्णांची ओळख पटवावी व त्यांचे उपचार होईपर्यंत त्यांना विशेष वॉर्डामध्ये ठेवण्याची व्यवस्था करावी, असे त्यांनी अधिकाऱयांना सांगितले. लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले. तसेच लोकांनी कोणती खबरदारी घ्यायला हवी याबाबत जनजागृती करण्याठी प्रशासकीय पातळीवर व्यापक प्रयत्न करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.









