काम तीन महिन्यापासून बंद असल्याने गावकऱयांचे हाल : रस्त्याच्या मधोमध काढलेले खड्डे अर्धवटच ठेवल्याने गैरसोय
प्रतिनिधी /खानापूर
कसबा नंदगड ग्राम पंचायत क्षेत्रातील झुंजवाड येथील जलजीवन मिशन योजनेंतर्गत पाणी योजना मंजूर झाली होती. याचे काम सुरू झाले होते. यासाठी संपूर्ण गावातील सिमेंट काँक्रिटचे रस्ते मधोमध खोदून पाणीपुरवठा करण्याची पाईपलाईन घालण्यात आली. मात्र कंत्राटदाराने हे काम गेल्या तीन महिन्यापासून अर्धवट स्थितीत सोडून गेल्याने नागरिकांना गावात चालत जाणे, दुचाकी, चारचाकी घेऊन जाणे कठीण बनले आहे. याबाबत ग्राम पंचायतीकडे वारंवार मागणी करुनदेखील ग्राम पंचायतीने याबाबत काहीच उपाययोजना केली नाही. यामुळे गावकऱयांतून संताप व्यक्त होत आहे.
झुंजवाड गावच्या यात्रेनिमित्त गावातील सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटचे केले होते. गावात पाणीपुरवठा योजना उत्तम प्रकारे सुरू होती. गटारींची सोयही चांगल्या प्रकारे होती. मात्र जेजेएमच्या माध्यमातून गावासाठी पाणी योजना मंजूर झाली. यासाठी कंत्राटदाराने गावातील सर्व रस्ते मधोमध खोदून पाणीपुरवठय़ासाठी पाईपलाईन घातली. मात्र कंत्राटदाराने काम अर्धवट सोडल्याने गावकऱयांना चालत जाणेही मुष्कील झाले आहे. गावात दूध वाहतूक करण्यासाठी येणारी गाडी खड्डय़ात दोनवेळा अडकून पडली होती. तसेच दुचाकी व चारचाकी वाहने घराबाहेरच ठेवावी लागत आहेत. त्यामुळे गावकऱयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. काम मार्गसुचीनुसार करण्यात येत नसल्याचे गावकऱयांनी
सांगितले.
कंत्राटदारावर कारवाई करण्याच्या सूचना
याबाबत कसबा नंदगड ग्रा. पं. अध्यक्ष महाबळेश्वर धबाले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, कंत्राटदाराला वारंवार काम पूर्ण करण्याच्या सूचना करत आहोत, मात्र कंत्राटदार वेळ मारुन नेत आहे. याबाबत पंचायतीतून कंत्राटदारावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. असे तरुण भारतशी बोलताना त्यांनी सांगितले.
तालुक्यात जेजेएमच्या कामाबाबत नुकत्याच झालेल्या तालुकास्तरीय बैठकीत ग्रा. पं. सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर यांनी कामाबाबत तक्रार करत कामात पारदर्शकता नसून कंत्राटदार मार्गसुचीनुसार काम करत नसून पाईपलाईन अवघ्या अर्ध्या फुटावर घालत आहे. कामही वेळेत करत नसल्याने कामाचा पूर्णतः बोजवारा उडाला असल्याची चर्चा नागरिकांतून होत आहेत. तालुक्यातील निम्म्या योजना अर्धवट असल्याचीही तक्रार त्यांनी केली.
संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी अधिकाऱयांनी दिले. काही कंत्राटदार कामे अर्धवट सोडून गेल्याने ग्रामीण भागातील जनतेला नाहक त्रास सोसावा लागत आहे. यासाठी तालुकास्तरीय जेजेएम अधिकाऱयांनी याबाबत आवश्यक कारवाई करावी, व अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करावीत, अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे.









