चिपळुणात रंगणार आज सोहळा, शिवानी बावकर, चेतन वडनेरेची उपस्थिती, ‘तरूण भारत’ माध्यम प्रायोजक
प्रतिनिधी/ चिपळूण
झी मराठी वाहिनीच्यावतीने 28 जानेवारी रोजी सायंकाळी शहरातील युनायटेड हायस्कूलच्या मैदानावर ‘झी मराठी संक्रांत क्विन’ कार्यक्रम रंगणार आहे. या सोहळय़ासाठी सोमवारी झालेल्या ऑडिशन्सला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून त्यातून 14 जणींची निवड करण्यात आली आहे. या सोहळय़ासाठी ‘लागीरं झालं जी’ फेम ‘शितली’ शिवानी बावकरसह अभिनेता चेतन वडनेरे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी ‘तरूण भारत’ माध्यम प्रायोजक आहे.
झी मराठी वाहिनी गेली अनेक वर्षे रसिकांसाठी सातत्याने दर्जेदार कलाकृतींचा नजराणा सादर करत आली आहे. मकरसंक्रांतीनिमित्त चिपळुणातील विवाहित महिलांसाठी या वाहिनीने ‘झी मराठी संक्रांत क्विन’चे आयोजन केले आहे. या माध्यमातून सौंदर्य, चातुर्य आणि कर्तृत्व सर्वांसमोर सादर करण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. या सोहळय़ासाठी सोमवारी युनायटेड इंग्लिश स्कूलच्या गुरूदक्षिणा सभागृहात नृत्य दिग्दर्शक गणेश राऊत यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या ऑडिशन्सला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 60 स्पर्धकांमधून वैशाली चव्हाण, प्राची गोखले, छाया पोटे, संगीता जोशी, साक्षी कोलगे, दीप्ती आवले, संगीता पालकर, ऋचा भागवत, मीरा भागवत, वेदा गुढेकर, सुप्रिया गुरव, राधा दाते, मनाली जाधव, सखी थरवळ या 14 जणींची अंतिम सोहळय़ासाठी निवड करण्यात आली.
ऑडिशनमधून निवड झालेल्या या चौदाही स्पर्धकाना स्वतः राऊत यांनी प्रशिक्षण दिले. पहिल्या फेरीत राऊत यांनी कोरिओग्राफ केलेले रॅम्प वॉक, दुसरी कामगिरी फेरी, शारीरिक चपळता चाचणी घेण्यासाठी लहान गेम फेरी, त्यानंतर जजेसच्या प्रश्नांची उत्तरे देणारी फेरी अशा फेऱया होणार आहेत. स्पर्धा विजेत्या ‘संक्रांत क्विन’ला स्वामिनी पैठणी, पहिल्या आणि दुसऱया रनरअपसाठी प्रत्येकी सेमी पैठणी देण्यात येणार आहे. या सोहळय़ानिमित्त हळदीकुंकू आणि उखाणे स्पर्धा होणार आहे. शिवाय प्रेक्षकांमधून ‘लकी ड्रॉ’देखील काढला जाणार असून विजेत्याला चांदीचे नाणे देण्यात येणार आहे.
स्पर्धेच्या अंतिम सोहळय़ाला ‘लागीरं झालं जी’ फेम ‘शितली’ म्हणजेच शिवानी बावकर उपस्थित राहणार आहे. अंतिम फेरीतील सोहळय़ाचे सूत्रसंचालन बावकर हिच्यासह ‘झी मराठी’वरील ‘अल्टीपल्टी’ या मालिकेतील ‘अलंकार’ म्हणजेच चेतन वडनेरे करणार आहेत. हा सोहळा सर्वांसाठी खुला राहणार आहे.









