देवगड झिपलाईन प्रकल्पाचे आमदार नीतेश राणेंच्या हस्ते उद्घाटन
ऍड.अजित गोगटे यांनी घेतला पहिला थरारक अनुभव
देवगडमध्ये लवकरच गो काटिंग व वॉटरपार्क
जानेवारीपासून बॉलिवुड चित्रपटांचे देवगडात चित्रीकरण
प्रतिनिधी / देवगड:
भारतातील समुद्र किनाऱयावरील पहिला आणि महाराष्ट्रातील सर्वात लांबीचा झिपलाईन सारखा प्रकल्प देवगडच्या पर्यटन वाढीसाठी महत्वाचा ठरणार आहे. पर्यटनाच्या नकाशावर देवगडचे नाव झळकणार असून आगामी काळात बॉलिवूड चित्रपटांचे शूEिटग देवगडमध्ये होणार आहे. तसेच देवगडमध्ये येत्या काही काळात गो कार्टिंग प्रकल्प सुरू करणार असल्याची माहिती आमदार नीतेश राणे यांनी देवगड झिपलाईन प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना दिली.
देवगड झिपलाईन प्रकल्पाचे उद्घाटन आमदार राणे यांच्याहस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार ऍड. अजित गोगटे, नगराध्यक्षा सौ. प्रियांका साळसकर, उपनगराध्यक्ष राजेंद्र वालकर, भाजपा जिल्हा चिटणीस बाळ खडपे, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश राणे, पंचायत समिती सभापती सुनील पारकर, उपसभापती डॉ. अमोल तेली, झिपलाईन प्रकल्पाचे संयोजक श्रीकांत जोईल, वैष्णवी जोईल, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर, माजी नगराध्यक्षा सौ. प्रणाली माने, माजी उपनगराध्यक्ष उमेश कणेरकर, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, रवी पाळेकर आदी उपस्थित होते.
आमदार राणे म्हणाले, झिपलाईन सारख्या ऍडव्हेंचर प्रकल्पामुळे देवगडच्या पर्यटनाला चालना मिळेल. केवळ देवगडमध्ये पर्यटन प्रकल्प न होता मालवण व वेगुर्लेमध्ये पर्यटनाचे वेगवेगळे प्रकल्प झाले पाहिजेत. येणारा पर्यटन तिन्ही तालुक्यात जायला हवा तरच जिल्हय़ाचा पर्यटनातून आर्थिक विकास होईल. आगामी काळात यासाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहोत. बॉलिवूडच्या चित्रपटांसाठी आता देवगडमध्ये येण्यास आपण भाग पाडले आहे. जानेवारीमध्ये नामवंत निर्मात्यांच्या चित्रपटांचे चित्रीकरण देवगडमध्ये होणार आहे. त्यातून देवगड तालुक्यातील पर्यटन स्थळाची ओळख देशात होईल व पर्यटक येथे मोठय़ा प्रमाणात येतील. देवगडमध्ये वॉटर पार्क व गो कार्टींगसारखे प्रकल्प लवकरच सुरू होणार आहेत. देवगड हा सिंधुदुर्ग जिल्हय़ातील प्रथम क्रमांकाचा पर्यटन तालुका होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच जोईल भावंडांनी उभारलेल्या झिपलाईन प्रकल्पाचे त्यांनी कौतुक केले.
प्रकल्पाचे संयोजक श्रीकांत जोईल यांनी सांगितले की, देवगडमध्ये झिपलाईन प्रकल्पासाठी 2017 पासून आपण प्रयत्न करीत आहोत. आपण लॉकडाऊनमध्ये नोकरीमधून निवृत्ती घेऊन हा प्रकल्प उभा केला आहे. देशातील पहिला समुद्र किनाऱयावरील झिपलाईन प्रकल्प करण्याचा मान मला व तालुक्याला मिळाला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून 11 जणांना रोजगार मिळाला असून 11 कुटुंबांना आधार मिळाला आहे. यापुढे देवगडचे नाव झिपलाईनसाठी ओळखले जाईल. तसेच ऍडव्हेंचरमध्ये अजून काही उपक्रम राबवून देवगडला कोकणातील ऍडव्हेंचर हब करण्याचा मानस असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या भगिनी वैष्णवी या प्रकल्पाबाबत बोलताना भावूक होत भावाने लॉकडाऊनमध्ये नोकरी सोडून जमविलेली सर्व पुंजी या प्रकल्पामध्ये गुंतवली असल्याचे सांगून हा आमचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे सांगितले.
यावेळी नगराध्यक्षा सौ. साळसकर यांनीही आपले विचार मांडले. झिपलाईन प्रकल्पाचे पहिले साहसवीर माजी आमदार ऍड. गोगटे ठरले. ऍड. गोगटे यांनी झिपलाईनचा पहिला थरारक अनुभव घेतला.









